आयुक्तांच्या गाडीवर ड्रेनेजचे पाणी ओतल्याच्या निषेधार्थ…..
महापालिका अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केली निदर्शने….
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि १३ ऑगस्ट – महापालिका आयुक्तांच्या गाडीवर ड्रेनेजचे पाणी ओतल्याच्या निषेधार्थ आज सकाळी महापालिकेत इंद्रभुवन समोर कर्मचारी व अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून निदर्शने केली. निषेधाच्या जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला. दरम्यान, याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
सम्राट चौक जवळ असलेल्या मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरात अनेक घरांमध्ये ड्रेनेजचे पाणी पसरते. महापालिकेत निवेदन द्यायला आले असता आयुक्त मीटिंगमध्ये असल्याने आयुक्त भेटणार नाहीत असे सांगण्यात आल्याने भीम आर्मी भारत एकता मिशनच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांच्या शासकीय गाडीवर ड्रेनेजचे घाण पाणी ओतल्याची घटना काल घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी महापालिका आवारात इंद्रभुवन समोर महापालिकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी काळ्याफिती लावून निषेध नोंदविला. निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. काळ्याफिती लावूनच कामकाज करण्यात आले.
याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. महापालिकेचे अनेक अधिकारी कर्मचारी हे नागरीसेवा देण्यासाठी श्रेत्रपातळीवर काम करतात. अशा प्रकारच्या लोकांमुळे व त्यांच्या कृतीमुळे मनोबल खच्ची झालेले आहे. साहजिकच त्याचा परिणाम अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यक्षमतेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा अनुचित घटना वारंवार घडू नये म्हणून उचित पायबंद घालण्यात यावा. महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करावे, असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी महापालिका उपायुक्त आशिष लोकरे , उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक संचालक नगर रचना मनीष भिष्णुरकर, सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक लक्ष्मीनारायण दोंतुल, मिळकतकर विभागाचे प्रमुख युवराज गाडेकर,अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक मुर्तुजा शहापुरे, सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी नितीन साठे, महापालिका आरोग्य निरीक्षक संघटनेचे अध्यक्ष शेषराव शिरसट , उद्यान विभागाचे अध्यक्ष किरण जगदाळे , पर्यावरण विभागाचे प्रमुख अक्षय मोरे, युसिडी विभागाचे व्यवस्थापक समीर मुलाणी, मतीन सय्यद जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार अजून सहा कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मानसिक खच्चीकरण करणाऱ्या प्रवृत्तीला विरोध
कर्तव्यावर असणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत असे प्रकार घडू नयेत. महापालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पदाला व महापालिकेच्या प्रॉपर्टीला धक्का लावणी ही गंभीर बाब आहे. आंदोलनाचा अधिकार सर्वांना आहे. पण ते विधायक मार्गाने असावे. आज घाण पाणी गाडीवर टाकले, उद्या आणखी काही विपरीत गोष्ट घडल्यावर काय करायचे ? आमचा कोणत्याही व्यक्तीस विरोध नाही तर मानसिक खच्चीकरण करणाऱ्या वृत्तीला व प्रवृत्तीला विरोध आहे. महापालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांवर अन्यायाला विरोध असेल. सर्वांनी कामे व्यवस्थित करावीत.कामगार हितासाठी कटिबद्ध आहोत. कालच्या घटनेचा जाहीर निषेध आहे.
– आशिष लोकरे, महापालिका उपायुक्त
खेदजनक निंदनीय घटनेचा निषेध : शिरसट
सदरची घडलेली घटना निंदनीय खेदाची आहे. ज्यांनी हा प्रकार केला त्यांचा निषेधच आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावेल. आज केवळ गाडी आहे. उद्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांसोबत असा प्रकार घडण्याची शक्यता आहे. स्वतःचे मोठेपण दाखवणाऱ्या प्रवृत्तीच्या निषेध ! यापुढे अशा व्यक्तींना पायबंद घालण्यासाठी पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात येईल, असे महापालिका आरोग्य निरीक्षक संघटनेचे अध्यक्ष शेषराव शिरसट यांनी यावेळी स्पष्ट केले.