माइंडेट नसलेल्या प्रभागात भाजपाचा लागणार का निभाव ?

माइंडेट नसलेल्या प्रभागात भाजपाचा लागणार का निभाव ?

२०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसचे पॅनल झाले होते विजयी ; त्या अगोदर तीन टर्म होते शिवसेनेचे वर्चस्व  

प्रभात २१ मध्ये हाती मशाल ; रियाज हुंडेकरी यांच्यासह प्रतीक्षा निकाळजे, किरण टेकाळे, भीमाशंकर म्हेत्रे करणार पुन्हा करिष्मा 

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.३ डिसेंबर

सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालेले आहे. ही निवडणूक चौरंगी ते पंचरंगी अशी होणार असल्याने या निवडणुकीत चांगलीच रंगत पाहायला मिळणार आहे. पूर्वाश्रमीचा शिवसेनेचा गड असलेला प्रभाग क्रमांक 21 मध्ये भाजपसह महाविकास आघाडी अंतर्गत तीन काँग्रेस आणि एक उद्धवसेना निवडणुकीचे रिंगणात उभी ठाकली आहे.

प्रभाग क्रमांक 21 मध्ये काँग्रेसचे पॅनल या निवडणुकीत सर्वात मजबूत असे मानले जात आहे. या ठिकाणी माजी स्थायी समिती सभापती रियाज हुंडेकरी हे आपला प्रभाग 18 सोडून 21 मध्ये लढत आहेत. अनुसूचित जातीचे आरक्षण महिला पडल्याने माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे यांनी आपली मुलगी प्रतीक्षा निकाळजे यांना या ठिकाणाहून उमेदवारी घेतली आहे.

ओबीसी महिलेतून काँग्रेस सेवादलचे शहराध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांची सून किरण टेकाळे या निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीत काँग्रेस शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी यांची आघाडी झाल्याने प्रभाग 21 मधून शिवसेनेकडून तीन टर्म नगरसेवक राहिलेले भीमाशंकर म्हेत्रे हे पॅनल मध्ये आले आहेत.

यामुळे हे पॅनल मजबूत मानले जाते. विरोधात भारतीय जनता पार्टीने दोन उमेदवार बाहेरचे दिल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर आहे. शिवसेनेमधून सुद्धा बाहेरचे उमेदवार आल्याने काँग्रेसला वातावरण चांगले असल्याचे बोलले जाते.

भीमाशंकर म्हेत्रे तीन वेळा नगरसेवक असल्याने त्यांचा जुना प्रभाग यावेळी आला आहे. लिंगायत आणि कुंभार समाजाचे म्हेत्रे त्यांच्या समाजाची मोठी मते आहेत तसेच या प्रभागात आंबेडकरी समाज, पद्मशाली समाज, मुस्लिम समाज, लोधी समाज यांची मते आहेत. यापूर्वी प्रवीण निकाळजे हे नगरसेवक राहिल्याने त्यांचा अर्धा प्रभाग आहे. स्वागत नगर भागात भीमाशंकर टेकाळे यांचा परिचय चांगला असल्याने त्यांना मानणारा वर्ग आहे.

भारतीय जनता पार्टी कडून संगीता जाधव, शिवाजी वाघमोडे, मंजिरी किल्लेदार आणि सात्विक बडवे यांना उमेदवारी दिली आहे. यामध्ये दोन उमेदवार इतर प्रभागातील आहेत. तर मागील अनेक महिन्यांपासून या प्रभागात तयारी केलेल्या सारिका सुरवसे, रवी कोळेकर यांना माघार घ्यावी लागल्याने त्यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज दिसत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचे पॅनल मजबूत मानले जाते. पक्षाने जोर लावला तर चारही उमेदवार विजयी होतील अशी जोरदार चर्चा प्रभागात सुरू आहे.

तर दुसरीकडे महायुतीमध्ये शिवसेनेकडे प्रभाग 21 आला आहे. येथून शिवसेनेचे धनुष्यबाण घेऊन अक्षय पकाले, मीना दास, पूजा खंदारे आणि अपक्ष पुरस्कृत संतोष भोसले हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह पकाले दास आणि खंदारे यांच्याकडे असले तरीही सर्व नवखे उमेदवार असल्याने त्यांचा करिष्मा चालणार का हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *