सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गाची तूट भरून काढण्यासाठी रु.१७ कोटी ९७ लाख ५५ हजाराची तरतूद
मंत्रालयाचे अवर सचिव वर्षा तांडेल यांच्या सही शिक्यांनीशी आला आदेश….
सोलापूर व्हिजन न्युज,
प्रतिनिधी|सोलापूर
सोलापूर विमानतळावरुन हवाई मार्गासाठी आर.सी.एस. योजना प्रत्यक्ष सुरु होण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने पुढील एक वर्षासाठी सोलापूर विमानतळावरून सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी तूट भरून काढण्यासाठी देण्यात येणाऱ्या सुमारे रु.१७ कोटी ९७ लाख ५५ हजार २०० इतका खर्च अपेक्षित आहे. सदर खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात येत आहे.रकमेची पूर्तता करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याशासन निर्णयामुळे सोलापूर मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्रालयाचे अवर सचिव वर्षा तांडेल यांच्या सही शिक्यांनीशी हा आदेश काढण्यात आला आहे.


सोलापूर विमानतळावरुन होणाऱ्या सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी राज्य शासनाकडून उडानच्या धर्तीवर एक वर्षांसाठी किंवा सोलापूर विमानतळासाठी आर.सी.एस.सेवा सुरु होईपर्यंत तूट भरून काढण्यासाठी मंत्रीमंडळाने तत्वतः मान्यता दिली आहे. त्यासंदर्भात (दि.९.१०.२०२४ ) च्या शासन निर्णयान्वये आदेश निर्गमित करण्यात आले आहे.

सर्व सामान्य नागरिकांना विमानप्रवास परवडेल या दृष्टीने ( एप्रिल २०१६ ) मध्ये केंद्र शासनाने प्रादेशिक राज्य जोडणी (आर.सी.एस) योजना जाहीर केली. या अनुषंगाने राज्यशासनाने या योजनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात भारत सरकार, महाराष्ट्र शासन व भारतीय विमानपत्तन प्राधिकरण (एएआय) यांच्यामध्ये (दि. २३) ऑगस्ट, २०१६ रोजी त्रिस्तरीय सामंजस्य करार करण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत अमरावती, गोंदीया, नाशिक, जळगाव, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या विमानतळांचा समावेश आहे. योजनेअंतर्गत विमानतळ परिचालक यांना काही सवलती देण्यात येत असून याबाबतची अधिसूचना दिनांक १८ एप्रिल, २०१७ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तसेच आर.सी.एस. योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या विमानतळाच्या मार्गासाठी राज्य शासनाकडून २० टक्के तूट भरून काढण्यासाठी देण्यात येणाऱ्या रकमेची पूर्तता करण्यात आली आहे.
केंद्रशासनाकडून सध्या आरएसीसी योजना नांदेड, जळगाव, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या विमानतळासाठी सुरु आहे. परंतु ज्या विमानतळासाठी ही योजना सध्या सुरु नाही तसेच ज्या विमानतळावर नियमित विमानांचे उड्डाण चालू नाही अशा ठिकाणी प्रवाशांची गैरसोय होते. त्याचप्रमाणे अशा विमानतळांच्या मार्गासाठी राज्य शासनाकडून कोणतीही सवलत अथवा निधी देण्यात येत नाही. त्या विमानतळ प्राधिकरणास या निधीची पूर्तता करण्यात येत आहे.
सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-पुणे या दोन्ही मार्गासाठी घोडावत एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड स्टार एअरने प्रतिसीट कमी दर सादर केल्याने या हवाई मार्गासाठी प्रतिआरसीएस आसनाकरीता ३२४० रु या दराने पूर्ण १०० टक्के तूट भरून काढण्यासाठी (व्हि.जी.पी) देण्यास शासन मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार सोलापूर विमानतळावरुन सुरू होणाऱ्या सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी राज्य शासनाकडून उडान योजनेच्या धर्तीवर एक वर्षासाठी किंवा सोलापूर विमानतळावरुन कोणत्याही हवाई मार्गासाठी केंद्र शासनाकडून उडान योजना सेवा सुरु होईपर्यंत हा फंड मिळत राहण्याची तरतूद शासनातर्फे करण्यात आली आहे.