मंद्रूपच्या विठ्ठल मंदिराचा १४ रोजी कळसारोहण सोहळा ;
तर १३ रोजी कळस मिरवणूक ; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
उत्तरादिमठाचे पिठाधिपती सत्यात्मतीर्थ स्वामींचे आशीर्वचन…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१० फेब्रुवारी
श्री क्षेत्र मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर येथील श्री विठ्ठल मंदिराचा कळसारोहण सोहळा शुक्रवार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे. श्री उत्तरादिमठाचे मठाधीपती श्री श्री श्री १००८ श्री सत्यात्मतीर्थ स्वामीजी यांच्या हस्ते कळसारोहण होणार आहे. या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पांडुरंग देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सुधीर देशपांडे यांनी दिली.
मंद्रूप येथील विठ्ठल मंदिराला सुमारे ३५० वर्षांची परंपरा आहे. मंदिरात प्रतिवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीनिमित्ताने चार दिवस उत्सव साजरा केला जातो. थोर संतपुरूष श्री. कुलगुरू तीर्थाचार्य महाराजांची मंद्रूप येथे समाधी आहे. मंद्रूपला प्रतिपंढरपूरही संबोधले जाते. मंदिरावरचे शिखर बांधकाम नव्याने करण्यात आले आहे. याचा कळसारोहण कार्यक्रम हजारो भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात केला जात आहे.
गुरूवार (दि.१३) रोजी दुपारी ४ वाजता मंद्रूपचे ग्रामदैवत मळसिध्द मंदिरापासून कळसाची मिरवणूक निघणार आहे. यामिरवणुकीत महिलांचे भजनी मंडळ, पुरूष भजनी मंडळ, बॅन्ड, कथ्थक नृत्य आदी विविध देखावे सादर केले जाणार आहेत. तर १४ रोजी सकाळी ८ वाजता कळसारोहण, पाद्यपूजा आणि मुद्राधारण होईल. त्यानंतर श्री उत्तरादिमठाचे मठाधीपती श्री श्री श्री १००८ श्री सत्यात्मतीर्थ स्वामीजी यांचे आशीर्वचन होणार आहे. या कार्यक्रमास विठ्ठल भक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पुजारी विश्वस्त भालचंद्र देशपांडे, पांडुरंग देवालय समितीचे सचिव अनंत देशपांडे, विश्वस्त गोविंद देशपांडे, गिरीधर देशपांडे, विजयकुमार देशपांडे आदींनी केले आहे.