सोलापुरात पावसाचे धुमशान ; आभाळ कोसळलं सर्वत्र पाणी पसरलं…सोलापुरात शाळा बंद  

सोलापुरात पावसाचे धुमशान ; आभाळ कोसळलं सर्वत्र पाणी पसरलं ; सोलापुरात शाळा बंद 

नागरिकांचे हाल बेहाल आयुक्त ऑन द स्पॉट ओन रिपोर्ट 

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर प्रतिनिधी 

मध्यरात्री सोलापुरात झालेल्या ढगफुटीसदृश तुफान पावसानं संपूर्ण शहरात हाहाकार माजवला आहे. रात्री बारा वाजता सुरू झालेला पाऊस हा सकाळी साडेसहा वाजेपर्यंत कोसळत राहिला. अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले असून, नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबसे यांनी शहरातील विविध सखल भागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत नागरिकांची विचारपूस केली आहे. प्रशासनाच्या वतीने योग्य ती मदत आणि सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.

दरम्यान शहरातील विडी घरकुल, दहिटणे, शेळगी आणि अक्कलकोट रोड परिसरात पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. तर तुळजापूर सोलापूर महामार्ग पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. महामार्गावर एखाद्या नदीप्रमाणे पावसाचे पाणी वाहत असल्याने येथे वाहनाची संथ गतीने वाहतूक सुरू असल्याने अनेक किलोमीटर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. शहरातील अनेक सखल भागांतील अनेक घरांत पाणी शिरल्यामुळे नागरिकांना रात्रभर जागून घरातील साहित्य वाचवण्यासाठी धडपड करावी लागली.

परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता, महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी विठ्ठल ढेपे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे. पाण्याखाली गेलेल्या परिसरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला असून, पालकांनीही यामध्ये सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *