बेंगलोरमध्ये १८ डिसेंबर रोजी गारमेंटचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन
गारमेंट उत्पादकांकडून गेल्या सात वर्षांत सुमारे ६० कोटींची गुंतवणूक, तर १५ हजार रोजगाराची झाली निर्मिती…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१२ डिसेंबर
सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांच्या माध्यमातून गारमेंट क्षेत्रातील गणवेश उत्पादकांनी गेल्या ७ वर्षांत ६० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्यातून अत्याधुनिक यंत्रसामुग्री प्राप्त झालेली आहे. या माध्यमातून सुमारे १५ हजार लोकांना रोजगार मिळाला. देशातल्या महानगरांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन भरवत असल्यानेच हा बदल झाला. देश-विदेशातील व्यापारी आगाऊ मागणी नोंदवून कामे देत असल्याने गणवेश उत्पादनात सोलापूरचे नाव झाले, अशी माहिती सोलापूर गारमेंट मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनचे फेअर चेअरमन सुनील मेंगजी यांनी दिली.
दरम्यान, यंदाचे आठवे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन कर्नाटक राज्याची राजधानी बेंगलोरमध्ये आयोजीत केल्याची माहिती त्यांनी दिली. दी.१८ ते २० डिसेंबर असे चार दिवसांचे हे प्रदर्शन शृंगार पॅलेस गार्डन येथे होईल. उद्घाटनाला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन् यांना निमंत्रित केले. आमदार सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या चार दिवसांच्या प्रदर्शनासाठी २० देशांतील व्यापार संघटनांना निमंत्रित केल्याचेही मेंगजी म्हणाले. प्रदर्शनात एकाच छताखाली १२०० ब्रँड व १० हजार युनिफॉर्म डिझाइन्स पाहायला मिळणार आहे.
तब्बल १२ देशांतील व्यापारी लावणार प्रदर्शनास हजेरी
बेंगलोर मध्ये संपन्न होणाऱ्या या प्रदर्शनात घाना, सेनेगल, सर्बिया, केनिया, जॉर्डन, म्यानमार, दुबई, नेपाळ, दक्षिण आफ्रिका, इस्राइल, थायलंड आणि मालदीव या १२ देशांतील व्यापाऱ्यांनी प्रदर्शनाला भेट देणार आहेत. तशी पूर्वनोंदणी त्यांनी केली.
विमानसेवा सुरू झाल्यानंतर उद्योगाचा होईल विस्तार.
जगातील एकमेव ‘युनिफॉर्म हब’ बनवण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांना सोलापुरातूनच सुरुवात झाली. त्यानंतर मुंबई, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, वाराणसीत झालेल्या या प्रदर्शनांना उदंड प्रतिसाद मिळाला. त्याला हजेरी लावणारे विदेशी व्यापारी सोलापूरच्या उत्पादनस्थळी येण्यास इच्छुक असतात. परंतु विमानसेवा नसल्याने त्यांची अडचण होते. याच महिन्यात विमानसेवा सुरू होत आहे. त्यामुळे व्यापारी आता थेट सोलापूरला येतील.
सुनील मेंगजी, चेअरमन