ऑपरेशन लोटस “त्या” आमदारांचा होणार भाजपात पक्षप्रवेश ; दस्तूरखुद्द शरद पवारांच्या बैठकीला मारली होती दांडी
आगामी निवडणुका सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडी म्हणून लढणार – शरद पवारांचा निर्धार

सोलापूर व्हिजन न्युज / प्रतिनिधी,
सोलापूर दि.२८ ऑक्टोबर
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली. या बैठकीला सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या चारपैकी तीन आमदारांनी दांडी मारली. हे बैठकीला केवळ माढ्याचे आमदार अभिजित पाटील हे एकमेव उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षात सुरू असलेल्या इनकमिंगला आता आणखी वेग येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील चार माजी आमदार( दि.२९ ) ऑक्टोबर रोजी भाजपात प्रवेश करणार आहेत.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश भाजपसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात असलेल्या चार आमदारांवर त्यांच्या तालुक्यासोबतच शेजारच्या एका तालुक्याची जबाबदारी आगामी निवडणुकीसाठी सोपविण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे. बैठकीला गैरहजर असलेल्या आमदारांवर आजच्या बैठकीत ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या बैठकीला राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष रवी पाटील उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष देशमुख म्हणाले, आमदार उत्तम जानकर यांना एका प्रकरणात दिल्लीला जावे लागल्याने ते आजच्या बैठकीला गैरहजर होते. करमाळ्याचे आमदार नारायण पाटील व मोहोळचे आमदार राजू खरे यांनी बैठकीला हजर राहता येणार नसल्याबाबत अगोदरच पत्र दिले होते. आगामी निवडणुका सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाल्याचे जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी सांगितले. या शिवाय त्या-त्या तालुक्यातील स्थानिक आघाड्या जर सोबत आल्या तर त्यांनाही सोबत घेण्याचे आजच्या बैठकीत ठरले आहे. प्रदेशाध्यक्ष शिंदे व सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी पाटील नोव्हेंबरमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी सांगितले.
समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील भाजप राज्य कार्यालयात आज बुधवार( दि.२८ ) ऑक्टोबर दुपारी १२ वाजता हा प्रवेश सोहळा होणार असून, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत माजी आमदार राजन पाटील यशवंत माने, आणि माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे हे शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप प्रवेश करणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात गेल्या अनेक दशकांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले असले, तरी आता भाजपने रणनीती आखत त्या बालेकिल्ल्यावर हल्ला चढवला आहे. या प्रवेशामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या गोटात मोठी चलबिचल निर्माण झाली आहे.

दरम्यान, दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांकडून विरोध नोंदवण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. मात्र पक्ष नेतृत्वाने मध्यस्थी करून स्थानिक पातळीवरील मतभेद दूर केले असून, अखेर सर्व माजी आमदारांचा प्रवेश निश्चित करण्यात आला आहे.
या घडामोडींनंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता असून, भाजपने स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर मोठा राजकीय मास्टरस्ट्रोक मारल्याचे मानले जात आहे. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी दिलीप माने यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.