एआय उपकरणांची ‘इलेक्ट्रो’ प्रदर्शनात धूम; ३६० स्टॉल्स, ५ डोम्समध्ये तंत्रज्ञानाची मेजवानी

एआय उपकरणांची ‘इलेक्ट्रो’ प्रदर्शनात धूम; ३६० स्टॉल्स, ५ डोम्समध्ये तंत्रज्ञानाची मेजवानी…

सोलापूर व्हिजन न्युज,

होम मैदानावर भरलेल्या ‘इलेक्ट्रो’ प्रदर्शनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची झलक पाहायला मिळत असून एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित उपकरणे यंदाचे मुख्य आकर्षण ठरत आहेत. सोलापूर इलेक्ट्रॉनिक डिलर्स असोसिएशन (सेडा) यांच्या वतीने आयोजित या भव्य प्रदर्शनात घरगुती तसेच औद्योगिक वापरासाठी उपयुक्त अशा सुमारे ३६० स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. पाच स्वतंत्र प्री-फॅब्रिकेटेड आणि कंपनी-फिटेड डोम्समध्ये विविध कंपन्यांनी आपली उत्पादने सादर केली आहेत.

 

 

प्रदर्शनात आवाजावर चालणारी स्मार्ट उपकरणे, स्मार्ट होम कंट्रोल सिस्टम, सोलर चार्जर, गुगल टीव्ही, १०० इंची स्मार्ट टीव्ही, एआय आधारित फ्रिज, वॉशिंग मशीन, एसी, स्वयंचलित भांडी धुण्याची मशीन, किचन अप्लायन्सेस, विविध प्रकारचे कुलर, म्युझिक सिस्टीम, गॅस गिझर, मोबाईल, आयपॅड, टेलिफोन, हेल्थ इक्विपमेंट, कॉम्प्युटर आदी वस्तूंची रेलचेल आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त एआय-आधारित शैक्षणिक साधनांनाही विशेष प्रतिसाद मिळत आहे.
उद्योजक, गृहिणी, विद्यार्थी आणि तंत्रज्ञानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देत असून नव्या उपकरणांची माहिती घेत आहेत. इलेक्ट्रॉनिक दुचाकीचे प्रदर्शन आणि ऊर्जा-बचतीवर आधारित उत्पादनेही लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे हे प्रदर्शन केवळ खरेदी-विक्रीपुरते मर्यादित न राहता नव्या युगातील तंत्रज्ञानाची ओळख करून देणारे व्यासपीठ ठरत आहे.

 

प्रदर्शनादरम्यान दररोज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून अवयवदानाबाबत जनजागृतीही केली जात आहे. खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी दररोज लकी ड्रॉ ठेवण्यात आला आहे. तसेच सात दिवसांत खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉद्वारे आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असल्याची घोषणा आयोजकांनी केली आहे.
एकूणच ‘इलेक्ट्रो’ प्रदर्शनामुळे सोलापूरकरांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची अनोखी संधी उपलब्ध झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *