शिस्तबध्द नियोजनामुळे लाडकी बहीण वचनपूर्ती सोहळा यशस्वी !

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कुशल नेतृत्वाने जिंकली उपमुख्यमंत्र्यांसह सर्वांची मने..
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर दि. ९ ऑक्टोंबर – राज्य शासनाने १ जुलै २०२४ पासून राज्यातील १८ ते ६० वर्षे वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. यायोजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रतिमहा पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यावर देण्यात येत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील १० लाख ७० हजार महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या असून आत्ता पर्यंत ७ लाख पेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यावर सुमारे ४८१ कोटी रुपये वितरित झालेले आहेत. त्या अनुषंगाने या योजनेचा वचनपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. या सोहळ्यास संपूर्ण जिल्ह्यातून ४० हजार पेक्षा अधिक महिला लाभार्थी उपस्थित होत्या. एवढ्या मोठ्या संख्येने लाभार्थी येऊन हा सोहळा भव्यदिव्य तर झालाच परंतु या सोहळ्यात सर्व प्रकारच्या सोयी सुविधा लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या होत्या.
दरम्यान जिल्हा प्रशासनाने सोहळा ठिकाण ते सर्व लाभार्थ्यांना सुविधा देण्याचे काटेकोरपणे नियोजन केलेले होते. परंतु तीन ते चार वेळेस हा सोहळा रद्द झाला, तो (दि.८)ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. राज्य शासनाचा हा महत्वाकांक्षी सोहळा भव्य दिव्य असा झाला असून यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे कुशल नेतृत्व तर महापालिका आयुक्त शितल उगले तेली, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे सहकार्य ही तेवढेच मौलिक ठरले आहे.
कार्यक्रमासाठी योग्य स्थळाची निवड
मुख्यमंत्री कार्यालयातून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रम घेण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या त्यानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रशासकीय यंत्रणेची बैठक झाली या बैठकीमध्ये या कार्यक्रमासाठी स्थळ निवड करण्यात आली. सुमारे ४० ते ५० हजार लाभार्थी बसू शकतील अशी व्यवस्था करणे तसेच त्यांना घेऊन येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था ही कार्यक्रम ठिकाणापासून साधारणत: एक किलोमीटरच्या अंतरात असावी या अनुषंगाने शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले श्री सिद्धेश्वर मंदिरासमोरील ‘होम मैदान’ निश्चित करण्यात आले.
कार्यक्रमाची योग्य बैठक व्यवस्था
लाडकी बहीण योजनेच्या सोहळ्यासाठी होम मैदान ही जागा निश्चित झाल्या नंतर त्या ठिकाणी चाळीस हजार महिला लाभार्थी व्यवस्थितपणे बसू शकतील यासाठी भव्य दिव्य असा वॉटरप्रूफ मंडप टाकण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण केली. या मंडपात चाळीस हजार खुर्च्या टाकण्यात आल्या. त्या प्रत्येक खुर्चीवर लाभार्थ्यांना पिण्यासाठी पाणी बॉटल देण्यात आली. तसेच मंडपाच्या बाजूलाही हजारोच्या संख्येने जागोजागी पाण्याचे जार ठेवण्याचे नियोजन करण्यात आले. मंडपाच्या तिन्ही बाजूंना सोलापूर महापालिका जिल्ह्यातील विविध नगरपालिका यांच्याकडे असलेले मोबाईल टॉयलेट असे एकूण ४५० मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली. तसेच हे टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले.
दरम्यान उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांच्यावर व्यासपीठ व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली होती. राजशिष्टाचाराप्रमाणे व्यासपीठावर मान्यवर व्यक्तींच्या चेअर व्यवस्थित आहेत का नाही यापासून ते सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून घेण्याबाबतची जबाबदारी त्यांच्यावर होती. जिल्हा नगरपालिका प्रशासन यांच्या वतीने जवळपास साडेचारशे मोबाईल टॉयलेटची व्यवस्था सभामंडप परिसरात तसेच पार्किंगच्या ठिकाणी करण्यात आलेली होती. या व्यवस्थेवर जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी विना पवार यांनी योग्य नियंत्रण ठेवून ही व्यवस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू ठेवली होती.
सभामंडपात येणारे सर्व लाभार्थी तसेच महत्त्वाचे अतिमहत्त्वाचे, व्यक्तींचे जेवण तसेच पत्रकारांसाठी जेवणाची व्यवस्था सभामंडपातील प्रत्येक खुर्चीवर पाणी बॉटल व्यवस्था करण्याचे नियोजन अत्यंत चोखपणे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी पार पाडले. तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांच्याबरोबर सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेली सर्व जबाबदारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कुशल नेतृत्वाखाली अत्यंत काटेकोरपणे पार पाडली.