१.८७ कोटीला गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाची पोलिस कोठडीत रवानगी

सोन्याच्या हांड्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याला लावला होता चुना ; जादूटोण्याच्या साहित्यासह विजापूरातून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घेतले ताब्यात
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर प्रतिनिधी
तुमच्या घरात सोन्याचे हंडे आहेत, ते हवे असतील तर विधिवत पूजा करावी लागेल, असे सांगून व्यापाऱ्यांकडून तब्बल १ कोटी ८७ लाख ३१ हजार ३०० रुपये घेतले. त्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ केल्यानंतर व्यापारी गोविंद वंगारी यांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी गोविंद मल्लिकार्जुन वंगारी (वय ४२, रा. कोंडा नगर, अक्कलकोट रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मोहम्मद कादर शेख (रा.आदिलशाही नगर, जर्मन बेकरी जवळ विजापूर कर्नाटक ) याला अटक करत येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, त्या भोंदू बाबावर फसवणूक, नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध कायद्यांतर्गत जेलरोड पोलिस ठाण्यात गुरुवार (दि.९) ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फसवणुकीचा हा प्रकार (जून २०२३) पासून सुरू होता.
आरोपी मोहम्मद कादर शेख याने फिर्यादी वंगारी यांना तुमच्या घरात सोन्याचे हंडे आहेत, असे सांगितले. यासाठी पूजा करावी लागेल, असे सांगून २१ नारळ घेऊन येण्यासाठी सांगितले. आरोपीने जून २०२३ रोजी घरात एक फुटाचा खड्डा खोदला. पूजेसाठी ५ लाख रुपये मागितले. त्यानंतर (१८ जून) रोजी गुप्त धन काढण्यासाठी चांगला दिवस आहे असे सांगून त्यांच्याकडून साडेसात लाख रुपये घेतले. त्यानंतर एक फुटाचा खड्डा करून विधी करण्यास सुरुवात केली.
तेव्हा खड्ड्यातून एक पितळी हंडा आढळला त्यावर एक झाकण होते. ते काढल्यानंत सोन्यासारखे कॉईन, हार असे साहित्य आढळले. तो हंडा एका कापडात बांधून पत्र्याच्या डब्यात ठेवला हे सोने घेण्यासाठी ६० दिवस हंड्याची पूजा करावी लागेल असे सांगितले. यासाठी तीन लाख रुपये खर्च येईल असे सांगितले. अशाच प्रकारे विश्वासात घेऊन आरोपीन फिर्यादीकडून एक कोटी ८७ लाख ३१ हजार रुपये उकळले. याच पैशाची मागणी वंगारी यांनी केल्यानंतर संशयित आरोपी देण्यास टाळाटाळ करू लागला. यामुळे फिर्यादीने घरातील हंड्यात पाहिल्यानंतर त्यात माती, पितळी वस्त आढळल्या, असे फिर्यादीत म्हटले आहे. याघटनेचा पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरविंद माने करत आहेत.
आरोपी खाण्यास द्यायचा!
एक फुटाच्या खड्ड्यात आरोपीने २१ नारळ फोडले. त्याचे पाणी खड्ड्यात ओतले, मंत्र इत्यादी जपले. त्यानंतर गुप्त धनाच्या हंड्याचे झाकण दाखविले. त्यानंतर पूजेसाठी पैशांची विचारणा करून खड्डा बुजवला. त्यानंतर प्रत्येकवेळी आरोपी हा त्यांना काहीतरी खाण्यासाठी देत होता.
पोलिसांच्या ०४ तपास पथकाद्वारे आरोपीला घेतले ताब्यात…
संशयित आरोपीला शोधण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांची ०४ तपास पथके रवाना करण्यात आली होती.सहा.निरीक्षक दत्तात्रय काळे आणि त्यांच्या तपास पथकास संशयित आरोपी हा विजापूर, राज्य कर्नाटक येथे असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्यानंतर, दि. ०९ ऑक्टोंबर २०२५ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांच्या तपास पथकाने विजापूर येथील आदिलशाही नगर येथून आरोपी मोहम्मद कादरसाब शेख याच्या मुसक्या आवळल्या. त्यावेळी राहत्या घरातुन त्याला ताब्यात घेताना जादुटोण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.