माजी नगरसेवकांच्या कोलांट्या उड्याने इच्छुकांची गोची ! डोक्यावर टांगती तलवार

महापालिका निवडणुकीत कोणता झेंडा घेऊ हाती संभ्रमावस्थेत अडकला नवखा इच्छुक 

इच्छुकांचा सत्ताधाऱ्यांकडे ओढा परंतु उभारण्यास नाही जागा 

नाईलाजाने आघाडीत सामील होण्याशिवाय नाही उरला पर्याय 

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर दि.१ डिसेंबर 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. ज्या स्थानिक स्वराज्य संस्था या ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेत आहेत. त्या जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. त्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचा देखील समावेश आहे. त्यामुळे सोलापूर शहरातील अनेक माजी नगरसेवक तसेच इच्छुकांची आपापल्या प्रभागानुसार चाचपणी सुरू झाली आहे. परंतु काही प्रभागात माझी नगरसेवकांनी कोलांटीउडी घेत, भाजप तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरल्याने इच्छुकांची मात्र गोची होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दरम्यान, निवडणूक पुढे ढकलली जाईल या अविर्भावात अनेक नेतेमंडळी आरामात होते. निवडणुकीची तयारी जोमाने केली नव्हती. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर मात्र सर्वच पक्षीय नेते खडबडून जागे झाले आहेत. निवडणुकीला अजून अवधी आहे नंतर बघू, असे म्हणत नॉट रिचेबल झालेले.. माजी नगरसेवक तत्काळ रेंजमध्ये आले आहेत. तर काहींनी थेट पक्ष बदलत नवीन पक्षाचा झेंडा हाती घेत आहेत. जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुका घ्याव्यात असे आदेश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला तसेच राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग आणि राज्य सरकार देखील अलर्ट मोडवर आले आहेत.

मात्र दुसरीकडे मतदार याद्यांचा घोळ अद्यापही कायम आहे. बोगस मतदान टक्केवारी वाढेल या चिंतेत विरोधक असून, मतदार यादीतील घोळ दूर करावा. त्यानंतर मतदान घ्यावे. असे विरोधकांचे म्हणणे आहे. परंतु याच गोंधळात निवडणुका पार पाडण्याचे चंग जणू निवडणूक आयोग आणि राज्य सरकार यांनी बांधलेले असल्याचे दिसून येत आहे. मतदार यादीतील घोळ दूर करण्यासाठी ज्या त्या महापालिका स्तरावर वेबसाईट द्वारे अर्ज भरण्या संबंधी सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सोलापूर महापालिकेच्या वेबसाईटवर देखील नावात बदल किंवा अन्य काही चुका मतदार यादीत आढळल्यास अर्ज भरण्यासंबंधी नियोजन करण्यात आले आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर ही प्रक्रिया पूर्णत्वास जाईल का? अशी साशंकता देखील व्यक्त केली जात आहे.

तर दुसरीकडे,प्रभाग रचनेतील हरकती काही माजी नगरसेवकांनी आपल्या पारंपारिक प्रभाग रचनेवर हरकती घेतल्या आहेत. काँग्रेसचे चेतन नरोटे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तौफिक शेख, यांसह अनेकांनी आपल्या प्रभागातील मतदार हे दुसऱ्या प्रभागात समाविष्ट केल्याच्या तक्रारी निवडणूक प्राधिकरणाच्या कार्यालयाकडे सुपूर्द केले आहेत. प्रभाग रचनेतील हरकती आणि मतदार यादी हरकतीसाठी दि.७ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने, त्यावर देखील अंतिम निर्णय होणे अद्याप बाकी आहे. शासनाने तसेच निवडणूक प्राधिकरणाने वेबसाईटवर अर्ज भरण्यासंबंधी सूचना जारी केल्या आहेत.

माजी नगरसेवकांनी वातावरण पाहता पक्ष बदल करणे महत्त्वाचे मानून राजकारणात सोयीस्कर मार्ग निवडला आहे. अनेक माजी नगरसेवकांनी भाजप पक्षाची वाट धरत सेफ राहण्यासंबंधी नियोजन केलेले दिसत आहे. मात्र यामुळे भाजपमधील निष्ठावान कार्यकर्ता दुखावला जात आहे. नव्या इनकमिंग मुळे पारंपारिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात नाराजीचा सूर आहे. परंतु पक्षशिस्त पाहता कार्यकर्ते दोन पावले मागे सरकण्याच्या भूमिकेत दिसत आहेत. तर दुसरीकडे इच्छुकांची देखील मोठ्या प्रमाणात गोची होताना दिसत आहे. सत्ताधाऱ्यांच्या पक्षात जावे की विरोधकांच्या, महापालिका निवडणुकीत कोणता झेंडा घेऊ हाती ! अशी संभ्रमावस्था नव्या इच्छुकांची झालेली दिसत आहे. महापालिका निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी, शहरात राजकीय वारे जोमाने वाहू लागल्याचे जाणवत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *