श्रीविठ्ठल मंदिरात भाविकांचा मेळा : शहरातील विविध मंदिरात संपन्न झाले धार्मिक कार्यक्रम

आषाढी निमित्त श्रीविठ्ठल मंदिरात भाविकांची मांदियाळी ; अबालवृद्ध भाविकांनी घेतले विठू माऊलीचे मनोभावे दर्शन…

सोलापूर व्हिजन

सोलापूर दी १७ जुलै – श्री विठूमाऊली आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी सोलापूर शहरातील चौपाड विठ्ठल मंदिर आणि जुने विठ्ठल मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच मांदियाळी होती. आषाढी एकादशीनिमित्त श्रींचे दर्शन घेण्यासाठी आबालृद्ध भाविक दर्शन रांगेत उभे होते.

                    महाराष्ट्रसह संबंध देशाचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेची आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीनिमित्त तीर्थक्षेत्र पंढरपूर मध्ये वारकऱ्यांचा आणि भाविकांचा मेळा भरला आहे. तर दुसरीकडे शहरातील विविध विठ्ठल मंदिरात देखील भाविकांची सकाळपासूनच गर्दी दिसून येत आहे. मंदिरात पहाटे पासून विविध धार्मिक कार्यक्रम महाभिषेक आणि काकड आरती तसेच महापूजा संपन्न झाल्यानंतर भाविकांसाठी श्रींचे दर्शन खुले करण्यात आले.

     यावेळी विठ्ठल नामाच्या गजरात अनेक भाविकांनी श्रींचे दर्शन घेण्यासाठी मंदिरा बाहेर दर्शन रांगेत उभे राहिले होते. शहरातील चौपाड विठ्ठल मंदिर भाविकांनी गजबजून गेले होते. आषाढीनिमित्त मंदिरांना आकर्षक रोषणाई तसेच झेंडूच्या फुलांनी सजावट करण्यात आली होती.

             जुन्या विठ्ठल मंदिरातील श्रींची बालरुपी लोभस मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. पुरातन मूर्ती म्हणून प्रसिद्ध असलेली श्रींची पाषाणमूर्ती आज देखील भाविकांसाठी प्रेरणास्त्रोत बनत आहे. जुन्या मंदिरात देखील विविध धार्मिक कार्यक्रम काकड आरती आणि महापूजा संपन्न झाली त्यानंतर भाविकांना तीर्थप्रसाद वाटप करण्यात आला.

दरम्यान श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीस विविध अलंकार आभूषण आणि भरजरी वस्त्र परिधान करण्यात आले होते. त्यामुळे श्रींची मूर्ती लोभस आणि आकर्षक भासत होती.  तुळशीमाळा आणि सुवासिक फुले श्री चरणी अर्पण करून भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिरातील पुजाऱ्यानी भाविकांना श्रींचा तीर्थप्रसाद दिला. यावेळी मंदिर परिसरातील सारे वातावरण प्रसन्नमय आणि भक्तीमय झालेले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *