तुमच्या-आमच्या अन माझ्या स्वाभिमानाची ही लढाई : काडादी
प्रज्ञावंतांच्या सहविचार सभेत विजयाचा निर्धार !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१० नोव्हेंबर – सोलापूर दक्षिण विधानसभेची निवडणूक ही तुमच्या-माझ्या स्वाभिमानाची लढाई आहे. हा स्वाभिमान जपण्यासाठी ही लढाई आपल्याला जिंकावीच लागेल, असा निर्धार या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी व्यक्त केला.
रविवारी, जुळे सोलापुरातील गोविंदश्री मंगल कार्यालयात आयोजित प्रज्ञावंतांच्या सहविचार सभेत ते बोलत होते. सोलापूर विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, अॅड. रा. गो. म्हेत्रस, स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे, श्री सिध्देश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते, माजी नगरसेवक शिवलिंग कांबळे, उद्योजक रवी आडगी, माजी प्राचार्य के. एम. जमादार यावेळी उपस्थित होते. अनेकांनी आपल्या भाषणातून काडादी यांना निवडून आणण्याचे आवाहन केले.
धर्मराज काडादी यांनी आपल्या भाषणातून सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्नांची उकल केली. राज्यातील नाकर्ते सरकार आणि इथले निष्क्रिय आमदार यांच्यामुळेच हे प्रश्न सुटले नाहीत असेही ते म्हणाले. गेली दहा वर्षे लोकांनी ज्या अपेक्षेने भाजपला निवडून दिले, त्या अपेक्षा पूर्ण करण्यात आमदारांना अपयश आले आहे. विकासाची कामे करण्याऐवजी त्यांनी सुडाचे राजकारण केले. व्यक्तिद्वेष करण्यातच आपली शक्ती वापरली. त्यामुळे मतदारसंघातील एकही प्रश्न सुटला नाही. विकासाची दृष्टी नसलेल्या अहंकारी आमदाराला आता घरी बसवण्याची वेळ आली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला हे कर्तव्य पार पाडा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना डॉ. इरेश स्वामी म्हणाले, दक्षिण सोलापूरला फार मोठी राजकीय परंपरा लाभली आहे. लोकांनी आग्रह केल्यामुळे धर्मराज काडादी यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ते सुसंस्कृत, अभ्यासू उमेदवार आहेत. या मतदारसंघाचे नेतृत्व करण्यास ते सक्षम आहेत. कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्यानंतर त्यांना ही संधी मिळणार आहे. मतदारांनी अन्य विचार करुन मत वाया घालवण्यापेक्षा काडादी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन स्वामी यांनी केले.