सोलापूर शहर व जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस ! २३ मे पर्यंत १२० मिलीमीटर पावसाची नोंद …
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२५ मे
गेल्या आठवड्यापासून शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे बहुतांश भागातील ओढे-नाले भरून वाहू लागले आहेत. इतकेच नाहीतर अनेक भागात धुवाँधार पाऊस पडल्याने उजनी धरणासह लहान-मोठ्या धरणाचा हळूहळू पाणीसाठा वाढू लागल्याची माहिती मिळाली. दरम्यान, आज (दि.२४) दिवसभर रिपरिप सुरूच असल्याने शहर-जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले.
सोलापूर जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत सरासरी १२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि तर पुणे विभागात सरासरी १३० मिलीमीटर पाऊस नोंदला गेला आहे. यानंतर शनिवारीही जोरदार पाऊस पडला आहे. यामुळे आता लवकरच खरिपाच्या पेरणीलाही सुरुवात होणार आहे. सोलापूर शहरात शनिवारी दिवसभर पडलेल्या पावसामुळे वाहनधारकांचे प्रचंड हाल झाले. या बदलत्या वातावरणामुळे तापमानाचा पारा ३० अंशांपर्यंत येवून पोहोचला आहे. एकंदरीत, मे महिना संपण्यापूर्वीच उकाडा गायब झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
उळेगाव-कासेगावचा ओढा ओसंडून वाहू लागला
दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगाव-कासेगाव, काटगाव, खानापूर, देवकुरळी, तामलवाडी, पिंपळा, सुरतगाव, वडगाव, मार्डी आदी विविध गावातून हिप्परगा तलावात पावसाचे पाणी सध्या येत आहे. गेल्या ४ दिवसांपासून उळेगाव-कासेगाव ओढाही भरून वाहत असल्याने हिप्परगा तलावाचा पाणीसाठा पावसाळ्यापूर्वीच वाढू लागला आहे. मे महिन्यात ओढे-नाले, ताली, वावरात पाणी सोसंडून वाहत असल्याने बुजुर्ग शेतकरीही आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
२३ मे पर्यंत १२० मिली रेकॉर्डब्रेक पाऊस!
आजतागायत मे महिन्यात कधीही अशी संततधार, सर्वदूर आणि १२०.६ मिमी इतका पाऊस झाला नाही, अशी माहिती जाणकार शेतकरी देत आहेत. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यताही ते वर्तवित आहेत. आपल्या जिल्ह्यातील तालुकानिहाय पाऊस पाहिला तर उत्तर सोलापूर १६३.७ मिमी, दक्षिण सोलापूर ११५, बार्शी १०३, अक्कलकोट १०९, मोहोळ १०७, माढा १४२, करमाळा १२७, पंढरपूर ८६, सांगोला १३५, माळशिरस १३२, आणि मंगळवेढा १२१ मिमी इतका पाऊस नोंदला गेला. तर जिल्ह्यात १२० मिली सरासरी पाऊस नोंदला आहे. तर विभागात १३० मिमी इतक्या पावसाची नोंद आहे. दरम्यान, शनिवारीही दिवसभर दमदार पाऊस झाला असून, याचा टक्का वाढला आहे.
ग्रामस्थांना होतेय रस्त्यांची अडचण
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर उळेगाव येथील अरूंद पुलाचे (एकेरी) पाडकाम चालू होते. मात्र या पट्ट्यात सतत पाऊस चालू असल्याने हा ओढा भरून वाहत आहे आणि यामुळे सध्या पुलाचे पाडकाम थांबविण्यात आले आहे. हा पूल पाडल्याने आणि सध्या ओढा भरून वाहत असल्याने स्थानिक नागरिकांना, शेतकर्यांना त्यांच्या जनावरांना महामार्गावरून वाहनांच्या गर्दीमुळे घेवून जाता येत नाही. यामुळे या नागरिकांना पुलावरून ये-जा करण्यासाठी कच्च्या पुलाची (लोखंडी पोल वापरून) मागणी आम्ही महामार्ग प्रकल्प संचालकांकडे केली असून, त्यांनी हे काम लवकर करावे.
नेताजी खंडागळे, उपसरपंच उळेगाव