तीन गोल्ड मेडलवर कोरले नाव ; पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केले कौतुक…
सोलापूर शहरातील वाहतूक शाखेच्या पोलीस पाल्यांनी कमावले नाव…
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २० जुलै – सोलापूर शहर वाहतुक शाखेत कार्यरत असणारे पोलीस हवालदार / १९३ श्री राजेंद्र खाडे यांचा मुलगा कु. रणवीर राजेंद्र खाडे, वय- १३ याने, जानेवारी २०२४ मध्ये दिल्ली येथे राष्ट्रीय अॅक्वेंटिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या शालेय संघातून तीन सुवर्णपदके प्राप्त केली. तसेच दि. ०७ जुलै ते ११ जुलै २०२४ रोजी इंदौर (मध्यप्रदेश) येथे ४० व्या ज्युनिअर आणि ५० व्या ज्युनिअर नॅशनल अॅक्वेंटिक चॅम्पियनशिप पार पडली. यामध्ये कु. रणवीर राजेंद्र खाडे याने तीन सुवर्णपदके मिळविली. सब ज्युनिअर गटामधून तीन मीटर स्प्रिंग बोर्ड, हाय बोर्ड व ०१ मीटर स्प्रिंग बोर्ड या तिन्ही प्रकारात त्याने सुवर्णपदक प्राप्त केले. रणवीर राजेंद्र खाडे याने ०३ सुवर्णपदक जिंकल्याने महाराष्ट्र चॅम्पियनचा हकदार ठरलेला आहे.
त्याला आंतररराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक श्रीकांत शेटे यांचे मार्गदर्शन लाभले. रणवीर राजेंद्र खाडे हा इयत्ता ७ वी मध्ये बी.एफ. दमाणी प्रशालेमध्ये शिकत आहे. पोलीस पाल्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून सोलापूर शहरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते कु. रणवीर राजेंद्र खाडे यांना बुके, प्रमाणपत्र, शाल, ट्रॉफी, मेडल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक श्री श्रीकांत शेटे यांचा ही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विजय कवाडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), दिपाली काळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हेशाखा), राजन माने, सहा. पोलीस आयुक्त (प्रशासन), उदयसिंह पाटील, पोलीस निरीक्षक, मानव संसाधन विभाग हे या सत्कार कार्यक्रमास उपस्थित होते.