“अवंतीनगर मधील स्थलांतरित नागरिक प्रल्हाद नगरमध्ये भोगताहेत नरक यातना” ! महापालिकेचे दुर्लक्ष

माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे महापालिका आयुक्तांना स्मरणपत्र !

समक्ष पाहणी करून लवकरात लवकर सर्व सुविधा उपलब्ध करण्याची केली मागणी …

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि. १८ ऑक्टोंबर – जुना पुना नाका येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते अवंतीनगर रस्त्याच्या निर्मितीसाठी रस्त्यासाठी अडथळा ठरत असलेल्या नागरिकांची घरे काढण्यात आली. त्यानंतर त्यांना महापालिकेच्या आरक्षित जागेत हद्दवाढ भागातील प्रल्हाद नगर येथे स्थलांतरित करण्यात आले. परंतु येथे नागरिकांना विविध सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.

           महापालिका आयुक्त, संबंधित वरिष्ठ अधिकारी, त्या भागातील नगरसेवक यांनी नागरिकांना आम्ही तुम्हाला सोलापूर महानगरपालिकेच्या आरक्षित जागेवर सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन देत त्यांना तेथून प्रभाग २६ मधील हद्दवाढ भागातील प्रल्हाद नगर, पंचवटी नगर येथे महापालिकेच्या आरक्षित जागेवर तात्पुरते पत्र्याचे शेड मारून देऊन तेथे फिरते शौचालय उभे करून देण्यात आले. परंतु वर्ष उलटून गेले तरी ही तेथे ड्रेनेज लाईन, पाण्याची पाईपलाईन, अंतर्गत रस्ते, दिवाबत्ती, शौचालय, नसल्यामुळे सदर नागरिकांना नरक यातना सहन कराव्या लागत आहेत.

      तेथील सर्वत्र झाडाझुडपांचे साम्राज्य वाढल्याने विषारी सर्प निघत आहेत. एका विद्यार्थ्याच्या बुटामध्ये साप आढळून आला. वेळीच लक्ष दिल्याने सदर विद्यार्थ्याचे प्राण वाचले नाहीतर अनर्थ घडला असता. तेथील नागरिक अनेक वेळा तेथील समस्या बाबत सोलापूर महानगरपालिकेत सतत निवेदन देऊन हेलपाटे मारून वैतागले आहेत. याकडे महापालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसत आहे.

 अन्यथा काढणार महानगरपालिकेवर जनआक्रोश मोर्चा.

स्थलांतरित नागरिकांच्या समस्याप्रकरणी सोलापूर महानगरपालिका आयुक्त शितल तेली उगले,अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, झोन अधिकारी नवनाथ बाबर, आदींना निवेदन देऊन देखील यावर ठोस उपाययोजना केली जात नाही. लवकरात लवकर तेथील समस्या दूर न झाल्यास वेळप्रसंगी त्या भागातील नागरिकांना सोबत घेऊन सोलापूर महानगरपालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढला जाईल.

– राजश्री चव्हाण, माजी नगरसेविका सोलापूर महानगरपालिका.

महापालिकेचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन ठरले खोटे.

अवंतीनगरचा प्रमुख रस्ता करण्यासाठी आमची घरे तोडली. महापालिकेच्या आरक्षित जागेवर परंतु निर्जनस्थळावर आम्हाला स्थलांतरित केले. येथे सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याचे आश्वासन महापालिका अधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु या घटनेला वर्ष होत आले तरी देखील या ठिकाणी आम्हाला विविध समस्या सहन करत दिवस काढावे लागत आहेत. याकडे महापालिका आयुक्तांनी लक्ष देणे गरजेचे बनले आहे.

– शंकर देशमुख, पीडित स्थलांतरित नागरिक.

वरिष्ठ कार्यालयाकडून माहिती घेऊन पाठपुरावा करू.

स्थलांतरित नागरिकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. महापालिकेच्या जागेवर स्थलांतर करण्यात आले आहे. त्यावर भूमी मालमत्ता कार्यालयाकडून कार्यवाही करण्यात येणार आहे. यासंबंधी माहिती घेऊन पाठपुरावा करू.

– नवनाथ बाबर, झोन अधिकारी सोलापूर महानगरपालिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *