स्थानिक लोकप्रतिनिधींसह महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष ; नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची होतीय मागणी….

सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २३ जुलै – स्मार्ट सोलापुरातील स्मार्ट रस्त्यांची दयनीय अवस्था बनली असताना शहरासह आता हद्दवाढ भागातील रस्ते देखील आता नागरिकांसाठी धोकादायक बनले आहेत. नीलम नगर इथले अंतर्गत रस्ते चिखलाने माखून गेले आहेत. यामुळे स्थानिक रहिवासियांना जिवंतपणी मरण यातना सहन कराव्या लागत आहेत.
सोलापूर शहरातील प्रमुख कामगार वसाहत म्हणून परिचित असलेल्या नीलम नगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे. स्थानिक नागरिकांना अंतर्गत रस्त्यांवरून जाताना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. सर्वत्र चिखलाचे आणि खड्ड्याचे साम्राज्य पसरलेले आहे. पाऊस पडल्याने सर्वत्र चिखल साचून अपघाताचा धोका बळावतो आहे.
शाळकरी मुलांना याच चिखलातून शाळेला जाण्यासाठी मार्ग काढावा लागत आहे. तर वाहनधारक सायकल स्वार आणि पादचारी यांना देखील चिखलमय रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ड्रेनेज लाईन पूर्ण झाली परंतु अद्यापही रस्ताच झाला नसल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना रस्त्यावरून जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. नीलम नगर परिसरात अनेक छोट्या मोठ्या नगरांचा देखील समावेश होतो. त्या ठिकाणी देखील मूलभूत सुविधा अद्यापही पोहोचल्या नाहीत. दिवाबत्ती , पाणी, रस्ता या मूलभूत आणि आवश्यक असणाऱ्या गरजा पुरवण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. सर्वत्र चिखलमय रस्ता आणि त्या रस्त्यातून वाट काढणारे नागरिक असे दयनीय आणि विदारक दृश्य नजरेस पडत आहे. नीलम नगर परिसरातील अस्वच्छता आणि दुर्गंधी यामुळे देखील विविध रोगराईला आमंत्रण मिळत आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे संबंधित विभागीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी यांनी तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे.
सोलापूर शहरातील नीलम नगर आहे का ? खेड्यातील एखादी वस्ती, हेच कळेनासे झाले आहे.
शहरातील कामगार वसाहतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हेच विदारक दृश्य आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे सातत्याने दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्याच पद्धतीने महापालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे देखील डोळेझाक करीत आहेत. त्यामुळे आम्ही नागरिक अशा पद्धतीने दिवस काढावेत. महापालिका टॅक्स पूर्ण वसूल करते मात्र सुविधा पूर्ण स्वरूपात देत नाहीत. ज्या ठिकाणी रस्ते ड्रेनेज नाहीत त्या ठिकाणी देखील पैसे लावले जातात. नळ नाही अशा ठिकाणी देखील नळपट्टी वसूल केली जाते. टॅक्स भरण्यासाठी देखील पुरेसा कालावधी दिला जात नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. सोलापूर शहरातील नीलम नगर आहे का ? खेड्यातील एखादी वस्ती, हेच कळेनासे झाले आहे.
– स्थानिक रहिवासी