सोलापूर शहरात वाढले धुराचे लोळ : नागरिकांमध्ये वाढले श्वसनाचे आजार….
धूर ओकणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची होतीय मागणी…

सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २७ जुलै – सोलापूर शहरांमध्ये धुराचे लोळ दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षा , ट्रक , टेम्पो अशा विविध वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे नागरिकांच्या स्वास्थ्याचे परिणाम गंभीर बनले आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत आहे.

सोलापूर स्मार्ट सिटीमध्ये विविध समस्या डोके वर काढत असताना शहरामध्ये धुराचे प्रमाण देखील वाढत आहे. वाढत्या धुरामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. शहरातील विविध रस्त्यांवर अगोदरच धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, अशातच आता वाहनांच्या सायलेन्सर मधून निघणारा धूर देखील नागरिकांच्या श्वसन प्रक्रियेत बिघाड निर्माण करत आहे.
शहरातील विविध रस्त्यांवर रिक्षा तसेच टेम्पो ट्रकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात धुराचे उत्सर्जन होत आहे. यामुळे रस्त्यांवरून जाणाऱ्या इतर वाहनधारकांना आपल्या नाकासमोर रुमाल किंवा मास्क लावावा लागत आहे. वयोवृद्ध वाहनधारकांना देखील याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. धूर आणि धूळ याची एलर्जी असलेल्या अनेक नागरिकांना सारखे दवाखाण्याचे हेलपाटे मारावे लागत आहेत. नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच पोलीस प्रशासनाने देखील कडक कारवाई करावी अशी मागणी आता वाहनधारकांमधून व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी मेडिकल मास्क परिधान करून प्रवास करावा
सध्याच्या अवस्थेत पर्यावरण संरक्षण काळाची गरज बनली आहे. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात धूर आणि धूळ वाढत आहे. रस्त्यावर जाणाऱ्या स्क्रप वाहनांमुळे धुराचे उत्सर्जन वाढत आहे. दुय्यम दर्जाचे मिश्रित इंधन वापरणाऱ्या वाहनांमुळे धूर वाढत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. वाहनधारकांमध्ये विशेष करून ज्येष्ठ नागरिकांमध्ये शासनाचे विविध आजार उद्धभवत होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी मेडिकल मास्क परिधान करून प्रवास करावा. श्वसनासंबंधी तक्रारी असल्यास तात्काळ आरोग्य केंद्र अथवा श्वसन तज्ञाकडे उपचार घ्यावेत.
– डॉ.राखी माने,आरोग्य अधिकारी सोलापूर महापालिका.
धूर ओकणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी
पोलीस प्रशासन नेहमी लायसन्स, इन्शुरन्स तपासणी करतात. फार कमी प्रमाणात पी.यू.सी तपासली जाते. मोठ्या वाहनांना तसेच टेम्पो , ट्रक अशा मालवाहतूक वाहनांना देखील त्याची पी.यू.सी.ची तपासणी करावी. धूर ओकणारी स्क्रॅप झालेले रिक्षा , टेम्पो अशी वाहने जप्त करून वाहनधारकांवर सक्त कारवाई करावी. जेणेकरून प्रदूषणामध्ये धुराचे प्रमाण कमी होईल आणि पर्यावरण संरक्षण होईल.
– ज्योतिबा गुंड,सामजिक कार्यकर्ते.