संपर्क कार्यालयासमोर केला कार्यकर्त्यांनी जल्लोष ; अण्णा अन् मालकांतच होणार थेट लढत…
महेश कोठे उत्तरमधून फायनल ; अर्ज सोमवारी करणार दाखल…!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२४ ऑक्टोबर- शहर उत्तर मतदारसंघाकडे सोलापूर शहर आणि जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. शहर उत्तर मधून माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुखांसह अनेक इच्छुक उमेदवारांनी अर्ज खरेदी केला असून, येत्या 3 दिवसांत हे सर्वजण आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, शहर उत्तर मतदारसंघात आ. विजयकुमार देशमुख आणि राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे यांच्यातच थेट लढत होणार असल्याचे चित्र आहे. तर आज (दि. २४) महेश कोठे यांचे नाव राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारी यादीत जाहीर होताच त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर त्यांच्या समर्थकांनी आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत आपला आनंद व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून माजी महापौर महेश कोठे यांनी आता तुतारी हाती घेत शहर उत्तर मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. ते येत्या सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात येते. तशी जोरदार तयारीही पूर्वीपासूनच कोठे समर्थकांनी केली आहे. महेश कोठे यांनी प्रत्यक्ष भेटी-गाठीवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. गुरूपुष्यामृत दिनाच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष विद्या लोळगे यांनी आज मुंबईत पक्षश्रेष्ठीकडून महेश कोठे यांचा Aएबी फॉर्म स्वीकारला. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व जयंत पाटील हे शहर उत्तरवर गेल्या कित्येक दिवसांपासून विशेष लक्ष ठेवून होते आणि माजी पालकमंत्र्यांच्या विरोधात महेश कोठे यांनाच उमेदवारी देण्यात येणार असल्याची यापूर्वी जाहीर केलं होत.
दिलेला शब्द पाळणारा नेता
महाराष्ट्रात अनेक दिग्गज नेते शरद पवारसाहेबांनी घडविले आहेत. त्यांनी माझ्या समाजकार्याचा आणि राजकीय कामांचा लेखा-जोखा पाहूनच मला तिकीट दिले आहे. यापूर्वीच त्यांनी मला या मतदारसंघात तयारी करा आणि कामाला लागा असा शब्दही दिला होता. त्या अनुषंगाने मी या मतदारसंघातील नागरिकांशीही गाठीभेटीवर भर दिला. आज मला राष्ट्रवादीतून (शरद पवार) तिकीट देवून पवारसाहेबांनी दिलेला शब्द पाळला आहे. त्यांच्या सानिध्यात गेल्यापासून मला 15 कोटीची विकासकामे मला मिळाली.यातून प्रत्येक समाजाला समाजमंदिरे आणि या मतदारसंघात विकासकामे केली. यामुळे आता मिळालेल्या संधीचे सोने मी करणार आहे.
– महेश कोठे, राष्ट्रवादी उमेदवार शहर उत्तर