सोलापुरात ज्येष्ठ नेत्यांमुळे राष्ट्रवादी बदनाम !
एकावर विनयभंग तर दुसऱ्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
सपाटेंची पक्षातून भुई सपाट तर नाना काळेंवर पोलिसांच्या तपासानंतर पक्ष घेणार निर्णय…
सोलापूर व्हिजन न्युज / प्रतिनिधी
सोलापूर, दि.४ जुलै
एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या त्याच सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी आता पुरती बदनाम झालेली दिसत आहे. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये गुरफटून गेले आहेत. माजी महापौर मनोहर सपाटे हे पुण्यातील एका ४५ वयाच्या महिलेच्या विनयभंग प्रकरणी सोलापुरातून फरार आहेत. तर दुसरीकडे माजी महापौर पद्माकर काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे युवा नेते ओंकार हजारे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सोलापुरातून गायब झाले आहेत. राष्ट्रवादीचे दोन्ही ज्येष्ठ नेते विविध गुन्ह्यात अडकल्याने सोलापूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादीची सर्वत्र बदनामी अन् नाचक्की होत आहे. सोलापुरातील दोन्ही घटनेच्या कानठळ्या ह्या मुंबई पर्यंत पोहोचल्या आहेत. हायकमांडच्या फोनाफोनी नंतर सपाटे यांना पक्षातून भुई सपाट करण्याचे आदेश काढण्यात आले. त्यानंतर लागलीच शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी सपाटे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. सदरची कारवाई करताना मात्र खरटमल हे कमालीचे अस्वस्थ झाले होते.
मनोहर सपाटे हे माजी महापौर तर पद्माकर काळे हे उपमहापौर राहिलेले. राष्ट्रवादीचे हे दोन ज्येष्ठ नेते असून त्यांनी आतापर्यंत विविध राजकीय पदे भोगली. मराठा समाज सेवा मंडळ आणि छत्रपती शिवाजी शिक्षण संकुल यांच्यावर आपली एक हाती सत्ता ठेवून मनोहर सपाटे यांनी आपली एकाधीरशाही चालवली. सर्वांना आपल्या तालावर नाचवले. विशेषतः शिक्षिका आणि महिलांना वाकड्या नजरेने पाहिले. त्यांच्यावर तब्बल २६ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले. मात्र अटक झाली नाही. राजकीय दबाव तंत्र वापरून सपाटे हे नेहमीच कायद्याच्या चाकोरीतून बाहेर पडायचे. परंतु सध्याच्या विनयभंग गुन्ह्यामध्ये सपाटे यांचा तथाकथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ जनमानसात पोहोचल्याने पोलिसांना यांची गंभीर दखल घेणे, भाग बनले आहे. सपाटे हे फौजदार चावडी पोलीस ठाण्यात हजर राहून आपला जबाब दिला. त्यावेळी पोलिसांनी सपाटे यांना नोटीस देऊन पाठवून दिले. मात्र त्यांच्यावर कोणतीच कडक कारवाई झाली नाही. नेमके याच घटनेचे पडसाद सोलापूर शहरात उमटले.
बाबासाहेब गावडे सांस्कृतिक भवनवरील सपाटे यांच्या नावाचा फलक हटवण्यात आले. छत्रपती शिवाजी शिक्षण संकुल येथे लावण्यात आलेला त्यांचा बॅनर काढण्यात आला. सपाटे यांच्यावर कडक कारवाई झाली नसल्यामुळे सोलापूर शहरातील मराठा समाज पेटून उठलेला, यावेळी कधी नव्हे ते दिसून आला आहे. राजकीय दबाव तंत्र आणि कायद्यातील विशिष्ट तरतुदींचा सहारा घेऊन काही काळ कायद्याच्या चौकटीतून बाहेर पडून सहकार्याची भावना आणि दया दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. आता मात्र स्वतःहून मराठा समाजात क्रांती पसरली असून सपाटे यांच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करावी.
अशी मागणी आता जोर धरू लागल्यानंतर पोलिसांनी देखील सपाटे यांच्या विरोधात कारवाईचा फास आवळल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सपाटे यांनी याप्रकरणातून आपल्याला अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे.
तर दुसरीकडे माजी महापौर पद्माकर काळे यांनी राष्ट्रवादीचे युवा नेते ओंकार हजारे यांना वारंवार मानसिक त्रास दिल्याचे उघड झाले आहे. प्रेमविवाह करणाऱ्या ओंकार हजारे यांना कौटुंबिक जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यातूनच हा नवा वाद सुरू झाला. ओंकार हजारे यांच्या पत्नी स्वाती, तसेच त्यांचे सासरे ज्ञानेश्वर पवार, मेहुणा मंगेश पवार आणि पद्माकर काळे, ओम घाडगे आणि इतरांनी वेळोवेळी हजारे यांना मानसिक शारीरिक त्रास दिला. ओंकार हजारे यांची पत्नी स्वाती हीला नांदवण्याची तयारी असताना देखील तिला घटस्फोट देण्यासाठी वारंवार या मंडळींकडून दबाव आणला गेला. यासर्व नैराश्यातून ओंकार हजारे यांनी आपल्या कारमध्ये आपली जीवन यात्रा संपवली. प्रथमदर्शनी हजारे यांच्या मृत्यूचा उलगडा झाला नाही. मात्र घटनेच्या तपासानंतर आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणीचे धागेदोरे समोर आले. कॉल डिटेल्स आणि स्टेटस यावरून ओंकार हजारे यांच्यावर किती प्रमाणात दबाव आणला गेला हे उघड झाले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर संशयित आरोपी पद्माकर काळे यांनी सोलापुरातून काढता पाय घेतला. हजारे यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्या प्रकरणी आपल्याला अटकपूर्व जामीन अर्ज मिळावा. यासाठी काळे यांनी देखील प्रयत्न सुरू केला आणि त्यांना अटकपूर्व अंतरिम जामीन मिळाले आहे. न्यायालयातील नाना काळे यांच्या वकिलांचे युक्तिवाद ग्राह्य धरून त्यांना २५ हजार जातमुचलक्यावर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झाले. नाना काळे यांच्याकडून एडवोकेट मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले.
सोलापुरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची बादशाहत पक्षासाठी बदनामीकारक ठरत आहे. विनयभंग आणि आत्महत्या या दोन्ही घटनांमुळे सोलापुरातील साहेबांची राष्ट्रवादी पुरती बदनाम झाली, असून पक्षाचे वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारीचा आणि समस्यांचा पाढा वाचला जात आहे. माजी महापौर मनोहर सपाटे यांना पक्षातून निलंबित केले आहे. मात्र माजी उपमहापौर पद्माकर काळे यांच्यावर अद्याप पक्षांतर्गत कोणतीही कारवाई झालेली नाही. राष्ट्रवादीच्या या ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या वर्तुळात जबरदस्त राजकीय वरदहस्त निर्माण केल्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे टाळले जाते. अशी कुजबुज ऐकण्यास मिळत असून, यापुढे काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
ओंकार हजारे आत्महत्या प्रकरणात राजकीय द्वेषाची किनार असल्याचे दिसून येत आहे. पद्माकर काळे यांना समाजात मानणारा वर्ग आहे. त्यांचा स्वभाव देखील मनमिळाऊ स्वरूपाचा आहे. पद्माकर काळे असे काही करतील. असे समाजात देखील वाटले नव्हते. सदरच्या प्रकरणांमध्ये पद्माकर काळे यांचे नाव राजकीय द्वेषापोटी गोवले गेले आहे. असा सूर आता राजकीय वर्तुळात ऐकण्यास मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील पोलिसांच्या तपासाकडे लक्ष देऊन आहे. खरेच राजकीय द्वेषापोटी त्यांचे नाव गोवले गेले आहे का. ? फौजदार चावडी पोलिसांच्या तपासानंतर काळे यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करायची की नाही. हे ठरवले जाणार आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून सांगण्यात आले.