सत्यम सत्यम… दीड्डम दीड्डम… लाखो भाविकांच्या साक्षीने श्री सिद्धेश्वरांचा अक्षता सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न !

“सत्यम सत्यम… दिड्डम… दिड्डम”चा उच्चार अन्‌ चारही दिशांनी झाला अक्षतांचा वर्षाव 

लाखो भाविकांच्या साक्षीने श्री सिद्धेश्वरांचा अक्षता सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न !

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दी.१३ जानेवारी

सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्‍वर महाराज यांचा अक्षता सोहळा सोमवारी संमती कट्टा येथे मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मानाचे पालखी आणि सात नंदी ध्वज संमती कट्टा येथे दाखल झाल्यानंतर सुगडी पूजन गंगा पूजन झाले त्यानंतर शेटे यांच्याकडे संमती वाचन करण्यासाठी मान देण्यात आला. सुहास शेटे यांनी सत्यम सत्यम… दिड्डम… दिड्डमचा उच्चार केला अन्‌ चारही दिशांनी एकच अक्षतांचा वर्षाव झाला. शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या आज दुसऱ्या दिवशी सोमवारी श्रीसिद्धेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर योगदंडाबरोबर अक्षता सोहळा संपन्न झाला. अक्षता सोहळा पार पडताच ‘हर्र बोला हर्र, सिद्धेश्वर महाराज की जय’च्या जय घोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

          तत्पूर्वी, सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हिरेहब्बू यांच्या उत्तर कसब्यातील वाड्यातून हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते पुजा होऊन मिरवणुकीने श्री सिध्देश्वर मंदिरात अक्षता सोहळ्यासाठी संमती कट्याजवळ दाखल झाले. येथे सातही नंदीध्वज आल्यानंतर श्री शिवयोगी सिध्दरामेश्वरांच्या हातातील योगदंडाच्या साक्षीने हिरेहब्बू व देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सुगडी पुजा संपन्न केली गेली. त्यानंतर कुंभार यांना हिरेहब्बू यांच्या हस्ते विडा दिला गेला. त्यानंतर तम्मा शेटे संमती मंगल अष्टक हे हिरेहब्बू यांच्या स्वाधीन करून त्यानंतर हिरेहब्बू व देशमुख यांनी त्या  संमतीची विधिवत पुजा केली. हिरेहब्बू यांनी शेटे यांना मानाचे विडे दिले. त्यानंतर हिरेहब्बू यांनी ते संमती मंगल अष्टक तम्मा शेटे यांच्या स्वाधीन केली. ही रुढी सुमारे नऊशे वर्षांपासून परंपरा चालत आलेली आहे. त्यानंतर हिरेहब्बू देशमुख व तम्मा शेटे संमती कट्टयावर येऊन त्याठिकाणी तम्मा शेटे यांनी संमती वाचन केले. अशाप्रकारे अक्षता सोहळ्याच्या कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खा. प्रणिती शिंदे उज्वला शिंदे यांची प्रमुख उपस्थिती…

       दरम्यान, अक्षता सोहळा संपन्न झाल्यानंतर मानाचे सातही नंदीध्वज अमृतलिंगाजवळ दाखल झाले. येथे हिरेहब्बू व शेटे यांच्या हस्ते अमृत लिंगाची पंचामृत अभिषेक करून विधिवत पुजा केली. त्यानंतर हिरेहब्बू यांनी शेटे यांच्यासह इतर मानकरी यांना मानाचा विडा दिला. त्याचप्रमाणे  श्रीसिध्दरामेश्वरांच्या गदगीस अभिषेक करून हिरेहब्बू यांनी विधिवत पुजा केली. तेथील विड्याचा मान तम्मा शेटे यांना दिला गेला. पुन्हा नंदीध्वज ६८ लिंगास प्रदक्षिणा घालून परत हिरेहब्बू यांच्या वाड्यात विसावले. या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सोलापूर सह आंध्र कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातील भाविक भक्त उपस्थित होते. मुखी सिद्धरामेश्वरचा गजर करत सर्वांनी हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला.

      यासोहळ्यास काशीपिठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, मानकरी तथा आमदार विजयकुमार देशमुख, खासदार प्रणिती शिंदे, उज्वला शिंदे, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, पुण्यश्लोक आहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, सुरेश हसापुरे, माजी नगरसेवक चेतन नरोटे, पोलिस आयुक्त एम.राजकुमार, महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले, शिवसेनेचे शिवाजी सावंत, श्रीसिद्धेश्‍वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, यात्रा समिती प्रमुख महादेव चाकोते, विश्‍वस्त ॲड. मिलिंद थोबडे, पशुपती माशाळ, रतन रीक्के, बाळासाहेब भोगडे, विश्वनाथ लब्बा, सिद्धय्या स्वामी, प्रभु मैंदर्गी, प्रकाश बिराजदार, सुभाष मुनाळे, बाबू पाटील, बीएस पटणे, नीलकंठ कोणापुरे, पुष्कराज काडादीं, चिदानंद वनारोटे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, दिपाली काळे, शहाजी पवार, अविनाश महागावकर, आदींसह श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे पदाधिकारी सदस्य आणि भाविक भक्तांसह आदींची उपस्थिती होती.

उद्या रात्री होम प्रदीपन व भाकणूक सोहळा 

यात्रेच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळी पालखी व मानाच्या नंदीध्वजाची हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते पुजा होऊन नंदीध्वज मिरवणूक जूनी फौजदार चावडी जवळ येऊन थांबतात. तेथे पहिल्या नंदीध्वजास नागफणी बांधतात. २ ते ७ नंदीध्वजांस बाशिंग बांधतात. पहिल्या नंदीध्वजास नागफणी बांधल्यानंतर हिरेहब्बूच्या हस्ते पुजा होते. पुजा झाल्यानंतर फडी नंदीध्वज पकडणारे व पहिली नंदीध्वज उचलून देणारे मास्तर यांना मानाचा हार घालण्यांत येतो. सध्या नागफणी नंदीध्वजाचे मानकरी सोमनाथ मेंगाणे यांच्याकडे असून ते सकाळ पासून उपवास करून तो नंदीध्वज एकट्याने होम मैदानापर्यंत आणतात. हौम मेदानांवर नंदीध्वज आल्यानंतर हिरेहब्बू होमकुंडात उतरतात. त्या होमकुंडात बाजरीचा पेंडीचे तयार केलेल्या कुंभार कन्येस शालू नेसून सौभाग्य अलंकार घालून त्या कुंभार कन्येस मणी, मंगळसूत्र, बांगड्या, जोडवे, हार दंडा घालून त्या कुंभार कन्येस सजवतात, त्यानंतर त्याची विधीवत पुजा करतात. त्यानंतर त्या कुंभार कन्येस हिरेहब्बू अग्नी देतात. त्यानंतर तेथील विड्याचा मान कुंभार यांना दिला जातो. त्यानंतर हिरेहब्बू, पालखी व नंदीध्वज होमांस पाच प्रदक्षिणा घातल्यानंतर होम प्रदीपन हा सोहळा संपन्न होतो. तदनंतर, तिळगुळाचा कार्यक्रम होऊन नंदीध्वज भगिनी समाजाजवळ येऊन थांबतात व नंदीध्वज आल्यानंतर त्याठिकाणी देशमुखांचा वासरू आणतात. त्या वासरांस दिवसभर उपवास ठेवला जातो. ते वासरू हिरेहब्बूच्याकडे स्वाधीन करतात. त्यानंतर पार्क मैदानावरील लिंगास पूजा करून आल्यानंतर हिरेहब्बू व देशमुख वासराची पुजा करतात. त्यानंतर वासरासमोर सर्व प्रकारचे धान्य व सर्व प्रकारचे विडा सामान ठेवले जाते. हिरेहब्बूंच्या हस्ते भाकणूक सांगतात. त्यावर्षीचे भविष्य राजशेखर हिरेहब्बू हे सांगतात. त्यानंतर नंदीध्वज मंदिरात येऊन परत मिरवणूकीने रात्री १.०० वा. नंदीध्वज हिरेहब्बूंच्या वाड्यात येतात. व त्यानंतर तेथे फडीचे मानकरी व हिरेहब्बू प्रसाद घेतल्यानंतर सर्व नंदीध्वजधारक व मानकरी यांना येथे महाप्रसादाचा कार्यक्रम होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *