भक्तांनी भर पावसात घेतले सिद्धरामेश्वरांचे दर्शन !
श्रावणाच्या शेवटी मंदिर परिसर आरासांनी फुलले….
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. २ सप्टेंबर – पवित्र श्रावणातील शेवटच्या सोमवारी ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी भर पावसात हजेरी लावली. यावेळी पावसातच आबालवृद्ध आणि महिला भाविकांनी शिवयोग समाधीचे दर्शन घेतल्याचे चित्र दिसून आले.
शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर आहे. रिमझिम आणि संततधार पाऊस कोसळत आहे. अशा पावसातही भाविकांनी श्रींचे दर्शन घेणे टाळले नाही. पावसामध्ये भिजत मंदिर गाठून ओल्या अंगानेच श्रीसिद्धरामेश्वर महाराजांच्या समाधीचे आणि गाभाऱ्यातील श्रींचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर परिसरात पुरुष भाविकांच्या तुलनेने महिला भाविकांची बरीच संख्या होती. मंदिर परिसरात लता वाले यांनी सातूच्या सहाय्याने सिद्धरामेश्वर यात्रेतील नंदीध्वज आणि बाराबंदी पोशाख परिधान केलेले मानकरी यांची प्रतिकृती साकारली होती. शेवटच्या श्रावण सोमवारी शिवमुठ सातू असल्याने मंदिरातील शिवलिंगांवर भाविकांनी सातू वाहून आशीर्वाद घेतले. यावेळी मंदिर परिसरात धार्मिक आणि अध्यात्मिक वातावरण पसरले होते.
द
दरम्यान श्री सिध्देश्वर महाराजांच्या गाभाऱ्यात देखील सुंदर आरास करण्यात आली होती. श्रींना पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करण्यात आले होते. त्यावर सुवासिक आणि रंगबेरंगी फुले पाने अर्पण वाहण्यात आली होती. पहाटेच्या सुमारास मंदिरात संपन्न झालेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मंदिरात हजेरी लावली.
त्यानंतर पावसाचा जोर वाढल्याने भाविकांची मंदिरात गर्दी कमी प्रमाणात दिसून आली. दर्शन रांगेमध्ये भाविकांची संख्या तुरळक होती. यामुळे गाभाऱ्यातील भाविकांना श्रींचे याथासांग दर्शन घेता आले.
शिवयोग समाधीस फुलांची आकर्षक सजावट…
श्रावण महिन्यात शिवयोग समाधीला दर सोमवारी आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात येते. त्याच अनुषंगाने शेवटच्या सोमवारी देखील झेंडू, अष्टर, शेवंती अशा विविध फुलांच्या माध्यमातून मोर प्रतिकृतीची मेघडंबरी साकारण्यात आली होती. मेघडंबरीच्या चारही बाजूंनी मोर प्रतिकृती साकारल्याने समाधी परिसर आकर्षक सजावटीने फुलून गेला होता.
श्रींच्या गर्भ गाभाऱ्यात धार्मिक विधी संपन्न…
श्रावण महिन्याच्या शेवट सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रम मंदिर आणि समाधी परिसरात संपन्न झाले. सकाळी महाभिषेक, काकडा आरती, सामूहिक ओम नमः शिवाय जप, बिल्वपत्र अर्चना, तांदूळ पूजा त्यानंतर महारआरती करण्यात आली.
– आनंद हब्बू , पुजारी श्री सिध्देश्वर मंदिर.