पहलगाम भ्याड आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन !
मोदीजी देश सुरक्षित हातात आहे हे दाखवून द्या – शहराध्यक्ष चेतन नरोटे
प्रतिनिधी सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२३ एप्रिल
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम परिसरात निष्पाप पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत संतापजनक, निंदनीय व भ्याड प्रकार आहे. निःशस्त्र, निरपराध नागरिकांना लक्ष्य बनवणे ही मानवतेविरुद्धची कृती असून अशा क्रूरतेचा काँग्रेस भवन सोलापूर समोर जाहीर निषेध करण्यात आला. तसेच काँग्रेस भवन मध्ये या हल्यात मृत्युमुखी पडलेल्या देशवासीयांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी भ्याड हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचा जाहीर निषेध करत पाकिस्तान मुर्दाबादच्या व भारत माता की जय या घोषणा देण्यात आल्या.
दरम्यान, शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले की, जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे घडलेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत निंदनीय असून, या भीषण हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा गेलेला बळी हृदय पिळवटून टाकणारा आहे. या अमानुष कृत्याचा सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या तीव्र निषेध करत आहोत आणि शहीद झालेल्या सर्व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत.
या निषेध आंदोलनात शहर महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, माजी महापौर आरिफ शेख, अलका राठोड, प्रदेश सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष जुबेर कुरेशी, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.