कॉ. आडम मास्तर सुशीलकुमार शिंदे यांची जनवात्सल्यावर सदिच्छा भेट
सोलापूर शहर मध्य चे कोडे सुटले ! सोलापूर व्हिजन च्या वृत्तानंतर आडम मास्तर यांनी घेतली थेट शिंदेंची भेट
आडम मास्तर यांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांनी दिला वृत्ताला दुजोरा
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि १० जुलै – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर मध्य मतदासंघांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून चढाओढ सुरू होती. विधानसभेच्या निवडणुकीसाठी अजून बराच कालावधी असताना अनेक ईच्छुक नेते मंडळी गुडघ्यालाच बाशिंग बांधून तयार झाले होते. खा.प्रणिती शिंदे या लोकसभेत गेल्यानंतर अनेकांना आमदारकीचे स्वप्न पडू लागले होते. शहर मध्य मतदार संघासाठी आम्हीच खरे वारसदार असे जणू घोषितच केले होते. मात्र या सर्वावर आता पडदा पडला आहे.
दस्तुर खुद्द माजी केंद्रीय सुशील कुमार शिंदे यांनी यावर पडदा टाकत माजी आमदार आडम मास्तर यांच्या नावावर मोहोर उमटवली आहे. त्यामुळे शहर मध्य हा महाविकास आघाडीसाठी सध्यातरी बंद झालेला विषय ठरत आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांची नावे मागितली होती. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला शहर मध्ये जी जागा सुटल्यास अडम मास्तर यांनी सहकार्य करावे असे म्हणाले होते.
त्यावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. सोलापूर व्हिजनने सदरचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर तात्काळ माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी आपल्या सहकाऱ्यांची बैठक बोलावून तातडीने जन वात्सल्य गाठले. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी आडम मास्तर यांना निश्चित राहण्यास सांगत शहर मध्य विधानसभा जागा तुम्हालाच देणार असे आश्वासन दिले. त्यानंतर आडम मास्तर यांनी आपल्या शिष्टमंडळासह सुशील कुमार शिंदे यांचा यथोचित मानसन्मान केला.
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सोलापूर येथील जनवात्सल्य या निवास्थानी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघाची जागा माकपाला सोडण्यासंबंधी पक्षाचे जिल्हा सचिव अॅड. एम.एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाद्वारे सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी या शिष्टमंडळात कॉ. नलिनीताई कलबुर्गी, कॉ. युसुफ शेख (मेजर), कॉ. व्यंकटेश कोंगारी, कॉ. कुर्मय्या म्हेत्रे, कॉ. रंगप्पा मरेड्डी, कॉ. अब्राहम कुमार, कॉ. म.हनिफ सातखेड, कॉ. शंकर म्हेत्रे, अनिल वासम, दाऊद शेख, नरेश दुगाणे, विक्रम कलबुर्गी, मोहन कोक्कुल, अरुण सामल, शामसुंदर आडम, आदींची उपस्थिती होती.