सोलापूर शहर दक्षिण नंतर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी आघाडीत बिघाडी !
काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांचे नाव मध्य साठी फायनल ?

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२७ ऑक्टोंबर – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये जागांच्या वाटपामध्ये चांगलाच गुंतागुंत पहावयास मिळाला. ही आमची जागा ती तुमची जागा, आमचा स्टॅंडिंग आमदार, तुमचा माजी आमदार, या अशा एक ना अनेक प्रश्नांमुळे महाविकास आघाडीत संभ्रमावस्था आणि गोंधळ निर्माण झाला.
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेने घाईने अमर पाटलांना उमेदवारी जाहीर केले आणि आघाडीत बिघाडी सुरू झाली. दरम्यान आघाडीत बिघाडी होण्याचे अंदाज यापूर्वीच सोलापूर व्हिजनने दिले होते. त्यानुसार सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी आणि आता त्यानंतर शहर मध्ये विधानसभा मतदारसंघासाठी खरे ठरताना दिसत आहेत. आज रात्री शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी माजी आमदार दिलीप माने यांचे नाव फायनल झाले आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी माने यांच्या कार्यकर्त्यांपुढे नमते घेत उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे माने समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे आणखीन एक नवीन बॉम्ब फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांचे नाव शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी पुढे येत आहे. जवळपास नरोटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस पक्षाची उद्या शेवटची उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. सदरच्या यादीमध्ये चेतन नरोटे यांचे नाव असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच नरोटे समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील आनंदाचे उत्साहाचे वातावरण दिसत आहे. आज रात्री दिलीप माने आणि उद्या सकाळी चेतन नरोटे असे दोन काँग्रेसचे नवे उमेदवार शहर दक्षिण आणि शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी असतील का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाराज चेतन नरोटे अखेर सुखावणार ?
विधानसभा निवडणूक लग्नाच्या अगोदर पासूनच चेतन नरोटे शहर मध्य विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी जोरदार तयारी केली होती. कार्यकर्त्यांचा मोठा जमावडा घेऊन फॉर्म सादर केला होता. आणि मध्ये साठी दावा ठोकला होता. मात्र काँग्रेस पक्षांतर्गत झालेल्या बदलाने बाबा मिस्त्री यांचे नाव सर्वप्रथम पुढे आले. त्यामुळे नरोटे आणि त्यांची समर्थक पक्षश्रेष्ठींवर नाराज झाले. दक्षिण मध्ये तीच अवस्था असल्याने दिलीप माने आणि चेतन नरोटे यांनी एकत्र येतं आपल्या पक्षश्रेष्ठींना दक्षिण व मध्य जागा काँग्रेसला सोडण्यात यावी यासाठी जोरदार तयारी सुरू केली. त्याची प्रचिती आज काँग्रेसची जाहीर झालेले उमेदवारी यादी वरून दिसून येत आहे. असाच बदल घडेल आणि नरोटे यांचे नाव फायनल होईल का ? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात ऐकण्यास मिळत आहेत.