शहर मध्य साठी भाजपचे चार इच्छुकांचे घमासान…
आपल्यापैकी एकाला उमेदवारी देण्याची केली मागणी
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. २३ ऑक्टोंबर – शहर मध्य मतदार संघात भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले चार इच्छुक बुधवारी एकत्र आले. आपल्यापैकी कोणाला तरी एकाला उमेदवारी मिळावी याबाबत त्यांनी सूर आळविला, मात्र ठोस असा निर्णय झाला नाही. यापार्श्वभूमीवर गुरुवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी बैठक घेऊन निर्णय घेण्याचे ठरले.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शहर मध्य मतदारसंघ आपल्याकडे ठेवावा असे भाजपला वाटते. या मतदारसंघात भाजपची ताकद लक्षणीय असल्याने हा मतदारसंघ काबीज करण्याची तयारी भाजपकडून केली जात आहे. या मतदारसंघात भाजपकडून अनेक जण इच्छुक आहेत. यामध्ये देवेंद्र कोठे, अनंत जाधव, पांडुरंग दिड्डी, श्रीनिवास संगा, अंबादास गोरटला यांचा समावेश आहे. यापैकी देवेंद्र कोठे हे काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये आलेले आहेत. त्यांना उमेदवारी देण्यास अनेकांचा विरोध आहे. याच अनुषंगाने नुकतेच भाजपचे अनेक पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देऊन कोठे यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी केली होती.
जुन्या व पक्ष निष्ठावंत व्यक्तीला संधी द्या अशी त्यांची आग्रही मागणी आहे. शहर मध्य मतदारसंघात भाजपतर्फे देवेंद्र कोठे यांचे पारडे जड असल्याची मोठी चर्चा आहे. सोशल मीडियावर या संदर्भातील काही वृत्त प्रसारित झाले. यामुळे अन्य इच्छुकांनी त्याची धास्ती घेतली आहे. इच्छुकपैकी अनंत जाधव, पांडुरंग दिड्डी, श्रीनिवास संगा, अंबादास गोरटला असे चार जण बुधवारी पांडुरंग दिड्डी यांच्या कार्यालयाजवळ एकत्र आले. आपल्यापैकी कोणालाही एकाला उमेदवार दिल्यास आपण पक्षाचे एकदिलाने काम करून उमेदवाराला निवडून आणू, यावर यावेळी या चार जणांमध्ये चर्चा झाली. यावेळी इच्छुकपैकी एकाने देवेंद्र कोठे यांनासोबत घेऊन याबाबतची भूमिका ठरवावी, अशी सूचना केली. त्यामुळे या चर्चेअंती काही निष्कर्ष काढण्यात आला नाही, असे सांगण्यात आले. याविषयी गुरुवारी पक्ष कार्यालयात पुन्हा एकत्र बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे यावेळी ठरले.
देवेंद्र कोठे आत्ताच पक्षात आले.
देवेंद्र कोठे हे आत्ताच भाजपमध्ये आलेले आहेत. त्यांना लगेचच विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देणे निष्ठावतांना नाराज करणारे आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर फेरविचार करावा.
– पांडुरंगा दिड्डी, ज्येष्ठ कार्यकर्ते भाजप.