सोलापूरचा पाणीपुरवठा आणखीन एक दिवस पुढे जाणार ! बाळे पुलाजवळ उजनी – सोलापूर जुनी पाईपलाईन फोडली : स्काडा प्रणालीमुले शोधली गळती
राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदाराचा कारनामा सोलापूरच्या मुळावर
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.३ जून
धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था सोलापूरकरांची झालेली आहे. उजनी – सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर सोलापूर शहराला पुरेसे आणि दिवस कमी होऊन पाणीपुरवठा होईल अशी आशा असतानाच आता सातत्याने पाईपलाईन फुटून सोलापूर शहराचा नियमित पाणीपुरवठा विस्कळीत होऊ लागला आहे. असाच प्रकार मंगळवारी दुपारी बाळे पुलाजवळ घडला आहे. बाळे पुलाजवळ आदीला नदी शेजारी सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने पिलरचे काम करताना मशिनरी थेट उजनी – सोलापूर पाईपलाईनलाच टच केल्यामुळे पाईपलाईन फुटून दुपारपासून लाखो लिटर पाणी थेट ओढ्यामध्ये मिसळत आहे.
सोलापूर महानगरपालिकेचे सहाय्यक अभियंता तपन डंके आपल्या टीमसह स्पॉटवर काम करत आहेत. पाण्याचा फ्लो मोठा असल्यामुळे कामात अडचणी निर्माण होत आहेत. केवळ आणि केवळ राष्ट्रीय महामार्गचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या चुकीमुळे सोलापूरकरांवर मात्र पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे.सोलापूर शहरातील काही भागाला उद्या बुधवारी पाणीपुरवठा होणार होता परंतु बाळेजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदारांनी मंगळवारी दुपारी कारणामा केल्यामुळे आणि मोठी गळती स्काडा प्रणालीमुळे समजल्यामुळे आता बुधवार ऐवजी गुरुवारी सोलापूरकरांना पाणीपुरवठा होणार आहे. सोलापूर महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंता तपण डंके यांनी तांत्रिक कारणास्तव आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत असल्यामुळे पाणीपुरवठा आता बुधवार ऐवजी गुरुवार होणार असल्याचे परिपत्रक काढले आहे
पाण्याचा हिशोब चुकता करावा
सोलापूर शहरातील जवळपास १५ लाख लोकसंख्येला सातत्याने विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्यामुळे शहरवासीय संतापले आहेत. संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून पाण्याचा हिशोब त्याच्याकडून चुकता करावा, अशी मागणी आता शहरवासीयांकडून करण्यात येत आहे.