संमतीपत्रावरील उपअडत्यांकडून शेतकऱ्यांची होतीय पिळवणूक
* कांद्याचे मागील वर्षीचे उत्पन्न मिळाले नसल्याच्या वाढल्या तक्रारी
* अद्याप पर्यंत १५ लाखांच्या देणी तटल्याने शेतकरी वैतागला
* कायदेशीर बाबींमुळे शेतकऱ्यांचा जिल्हा उपनिबंधाकडे प्रकरण वर्ग
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. १७ ऑक्टोंबर – महाराष्ट्र राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती म्हणून ओळख असणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गैरकारभाराला मोठ्या प्रमाणात ऊत आल्याचे उघडकीस येत आहे. पणन कायद्यानुसार मूळ गाळामालक अडत व्यापाऱ्याला संमतीपत्रावर दुसऱ्या कोणालाही त्यांचे हक्क व अधिकार देता येत नाहीत, तरीसुद्धा असा धक्कादायक प्रकार सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे.गतवर्षी कांद्याच्या हंगामात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची करोडोंची उलाढाल झाली होती. त्यातील अनेक धनादेशाची तारीख संपूनही धनादेशाची रक्कम न मिळाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे केल्या होत्या. सध्या त्यातील सुमारे १५ लाख रुपये अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
सोलापूरसह राज्यातील विविध जिल्ह्यांमधून शेतकरी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांदा विक्रीसाठी आणतात. यंदा पाऊस चांगला झाल्याने कांदा लागवड देखील वाढल्याचे चित्र आहे. अशावेळी हंगामामध्ये स्वत:ला फायदा व्हावा म्हणून बाजार समितीचा मूळ परवाना नसलेले बाहेरील व्यापारी लोक मूळ गाळामालकाकडून संमतीपत्रावर व्यवहार करण्याचा परवाना घेतात. त्याद्वारे ते बिनधास्तपणे व्यवहार करतात. अनेकजण त्या मूळ गाळेमालकाचे नाव वापरून शेतकऱ्यांना कांदा आपल्याकडे टाकायला लावतात. मात्र जेव्हा कांद्याची पट्टी देण्याची वेळ येते तेव्हा मात्र, हे बाहेरील व्यापारी गायब होतात.
दरम्यान, १५ हजारांहून अधिक रक्कम झाल्यावर त्याशेतकऱ्याला १५ दिवसांची तारीख टाकून धनादेश देतात. दूर अंतरावरील शेतकरी तो धनादेश बॅंकेत टाकतात आणि त्या खात्यात पैसे नसल्याने तो वटला जात नाही. संबंधित व्यापाऱ्याकडे विनवणी करूनही एकरकमी पैसे मिळत नाहीत, अशीही वस्तुस्थिती बाजार समितीत पहायला मिळत आहे. बाजार समितीवर सध्या प्रशासक असून त्यांच्याकडून शेतकऱ्यांना खूप आशा आहेत. जिल्हा उपनिबंधक देखील याप्रकाराकडे गांभीर्याने पाहून ठोस कारवाई करतील, असा विश्वासही शेतकऱ्यांना आहे. परंतु काही ठराविक आडत व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाते. तर उर्वरित व्यापारी या कारवाईपासून वाचले जातात. त्यामुळे संबंधित अडत्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
बाजार समितीत गैरप्रकाराला घातले जाते खत-पाणी
सोलापूर बाजार समितीत मूळ अडते तथा गाळामालक ४०० पर्यंत आहेत. त्यातील अनेकजण बाजार समितीत येत नाहीत. त्या मूळ गाळेमालकांसह अन्य अडत्यांकडून काहीजण २०० ते ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर संमत्तीपत्र घेतात. त्याला मूळ गाळामालक जामीनदार असतो. त्याद्वारे तो उपअडते शेतमालाचे व्यवहार करतात. धक्कादायक बाब म्हणजे याची माहिती बाजार समितीतील अनेक अधिकाऱ्यांना आहे. तरीदेखील या गैर कारभाराला खत पाणी घातले जाते.
– प्रभू कोरे, शेतकरी.
संबंधित गाळ्याचा लिलाव करून शेतकऱ्यांची देणी देवू
मूळ गाळाधारकांनीच शेतमालाचे व्यवहार करणे बंधनकारक आहे. कोणी संमतीपत्रावर दुसऱ्याला गाळा चालवायला दिला आणि शेतकऱ्याची देणी थकविली तर त्या तक्रारींवरून संबंधित गाळ्याचा लिलाव करून त्या शेतकऱ्यांची देणी दिली जातील. संमतीपत्रावर कोणालाही उपअडते म्हणून शेतमालाचे व्यवहार करण्याचा परवाना देता येत नाही.
– मोहन निंबाळकर, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती