सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदान ; उमेदवारांचे भवितव्य ठरणार उद्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात लागणार निकाल 

सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी झाले मतदान !

उद्या श्रीसिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात लागणार निकाल…

सोलापूर शहरातील श्रीसिद्धेश्वर मतदान केंद्रावर सर्वाधिक मतदान…

सोसायटी मतदारसंघातून झाले चुरशीने मतदान…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२७ एप्रिल

राज्यात विक्रमी आर्थिक व्यवहारांसाठी अग्रगण्य असणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपलाच झेंडा राहावा, यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत जंग जंग पछाडून मतदान केले आहे. रविवार दिनांक २७ एप्रिल रोजी सोलापूर शहर जिल्हा तसेच राज्याचे लक्ष लागलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदान केंद्रावरील गर्दी पाहता मोठ्या चुरशीने मतदान होत असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघापेक्षा ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

बाजार समितीच्या २८ संचालकपदाच्या जागांसाठी सोलापूर शहरातील सिद्धेश्वर प्रशाला, नान्नज, तिऱ्हे, मंद्रूप, आहेरवाडी, निम्बर्गी, वळसंग, बोरामणी आठ मतदान केंद्रावर रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांनी सर्व मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून सर्वत्र लक्ष ठेवण्यात आले आहे. सकाळी आठ ते दहा या दोन तासात २० टक्के मतदान झाल्याचे आकडेवारी समोर आली. परंतु त्यानंतर गर्दी पाहता पुढील दोन तासात मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने, दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे यांच्या पॅनल विरोधात राज्याचे माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख व आमदार विजयकुमार देशमुख यांनी पॅनल उभे केले आहे. भारतीय जनता पार्टीच्या दोन आमदारांमध्ये बाजार समितीसाठी लढत असल्याने कोण जिंकणार याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली आहे.

 

   दरम्यान, बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सोसायटी मतदारसंघातून ११, ग्रामपंचायत मतदार संघातून ४, व्यापारी मतदारसंघातून २ आणि हमाल तोलार मतदारसंघातून १ अशा १८ जागा निवडून द्यायचा आहेत.माजी चेअरमन दिलीप माने यांनी तिऱ्हे मतदान केंद्रावर सकाळी आठ वाजता आपल्या मतदानाचा हक्क बजावला तसेच निम्बर्गी या मतदान केंद्रावर सुरेश हसापुरे यांनी मतदान केले.

निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड मतदान केंद्राची पाहणी करताना…

 

उत्तर तालुक्यातील नान्नज या गावी असलेल्या मतदान केंद्रावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, उमेदवार तथा भाजपचे युवा नेते मनीष देशमुख यांचे बंधू रोहन देशमुख हे ठाण मांडून असल्याचे दिसून आले. तसेच याच मतदान केंद्रावर उमेदवार गणेश वानकर, युवानेते पृथ्वीराज माने, उमेदवार अविनाश मार्तंडे हे सुद्धा ठाण मांडून होते. बाजार समितीचे सर्वाधिक मतदान हे सोलापूर शहरातील सिद्धेश्वर प्रशाला येथे असल्याने या केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. व्यापारी मतदारसंघात मुस्लिम समाजातून एकच उमेदवार आहे. परंतु व्यापारी वर्गातून यंदा बंडखोरी झाल्याने लिंगायत समाजातून तीन उमेदवार एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्या निकालाकडे ही सर्वांचे लक्ष राहणार आहे.

मतदान केंद्रावर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले आहेत. त्याचे नियंत्रण जिल्हा उपनिबंधक कार्यालय तथा बाजार समिती निवडणूक निर्णय कार्यालय येथे करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर कॅमेरे लावण्यात आल्याने मतदान हे पारदर्शी होणार आहे. तसेच कोणताही अनुचित व गैरप्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच डीबी पथक यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर सोमवार दि.२८ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत मतमोजणी आणि अंतिम निकाल घोषित करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *