पुन्हा एकदा बाजार समिती निवडणूक प्रक्रियेला ३१ डिसेंबर पर्यंत स्थगिती !
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निर्णय.
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. ७ ऑक्टोंबर – सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली होती. निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला होता. परंतु आता या निवडणूक प्रक्रियेला (दि.३१) डिसेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्यानंतर सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे कामकाज करणे अडचणीचे ठरणार आहे त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात येत आहे. असा आदेश राज्य शासनाचे उपसचिव संतोष देशमुख यांच्या सहीनिशी काढले आहेत.
दरम्यान सोमवार (दि.७) ऑक्टोबरपासून अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. सुमारे १८१ अर्जांची देखील विक्री करण्यात आली होती. मात्र या प्रक्रियेला राज्य शासनाने पुन्हा एकदा स्थगिती देऊन सदरचा कार्यक्रम (दि.३१) डिसेंबर पर्यंत पुढे ढकलाला आहे. राज्यातील ईतर सहकारी संस्थांच्या निवडणुका देखील पुढे ढकलण्यात आल्याचे परिपत्रक आज सायंकाळी काढण्यात आले आहे.
पावसाळ्याचे कारण देत राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व सहकारी संस्था आणि पणन विभागाकडील बाजार समित्यांच्या निवडणुकांना ३० सप्टेंबरपर्यंतची स्थगिती दिली होती. ही मुदत संपल्याने सहकारी पतसंस्था आणि बाजार समित्यांच्या निवडणुका घ्याव्यात, असे परिपत्रक राज्य सरकारने काढले आहे. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.