अखेर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे बिगुल वाजले…! दिवाळीत वाजणार फटाके...
नोव्हेंबर महिन्यात होणार मतदान ; बाजार समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर ;
– राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण सचिव अशोक गाडे यांचे सोलापूर जिल्हा उप निबंध कार्यालयाला आदेश…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. ४ ऑक्टोंबर – महाराष्ट्र राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती म्हणून ओळख असणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीची प्रक्रिया अखेर सुरू होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. ऑक्टोंबर महिन्यात अर्ज स्वीकृती तर नोव्हेंबर महिन्यात मतदान असणार आहे. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आली आहे.
दरम्यान याबाबत दोन दिवसात निवडणुकीचा कार्यक्रम अधिकृतपणे घोषित होणार आहे. ७ ते ११ ऑक्टोबर दरम्यान अर्ज स्वीकृती होणार आहे आणि १० नोव्हेंबरला मतदान आणि ११ नोव्हेंबर रोजी मतमोजणी अशी प्रक्रिया राहील असे प्राथमिक स्तरावर सांगण्यात आले होते. शेवटी यावर अंतिम शिक्कामोर्तब झालं आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण सचिव अशोक गाडे यांच्या सहीनिशी आदेश पारित करण्यात आले असून सदरचे आदेश सोलापूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला देण्यात आले आहेत.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सध्या भाजपचे आमदार विजय देशमुख यांच्या गटाचे वर्चस्व आहे. तत्कालीन सभापती दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांनी भाजप काँग्रेस असा सुवर्णमध्ये साधून सभापती भाजपचा आणि सदस्य काँग्रेसचे अशा पद्धतीने आपली सत्ता बाजार समितीवर आणली.तत्पूर्वी आमदार विजय देशमुख यांना सलग तीनदा संचालक मंडळाची आणि सभापती पदाची मुदत वाढ मिळाली होती. अखेर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून याबाबत सविस्तर कार्यक्रम हे त्या दोन दिवसात जाहीर होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला होता. त्यामुळे ती निवडणूक चांगलीच गाजली. तरीही त्यावेळी सुभाष देशमुख यांच्या पॅनलचा पराभव झाला होता. आता या निवडणुकीत सुभाष देशमुख आणि विजय देशमुख यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी त्यामुळे बाजार समितीमध्ये समीकरण बदलण्याची चिन्हे..
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दक्षिण मतदारसंघातून विद्यमान आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार दिलीप माने, श्री सिद्धेश्वर परिवाराचे धर्मराज काडादी, सुरेश हसापुरे,. अशा अनेकांनी इच्छा व्यक्त करत, आगामी विधानसभेची तयारी सुरू केली असल्याने यंदा बाजार समितीवर कोणाचे वर्चस्व राहील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
उपनिबंधक कार्यालयाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही..
सोलापूर बाजार समितीचे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाले असल्याचे कळवण्यात आले आहे. याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून रीतसर सूचना व आदेश प्राप्त होतील त्यानुसार आगामी कार्यवाही करण्यात येईल.
– मोहन निंबाळकर, प्रशासक सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती.