बाजार समितीसाठी ९६.२४ टक्के मतदान ! थोड्याच वेळात मतमोजणी होणार सुरू ; क्रॉस वोटिंगची उमेदरांना भीती
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२७ एप्रिल
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे मतदान शहर व जिल्ह्यातील विविध ८ मतदान केंद्रांवर एकूण ९६.२४ टक्के इतके झाले. राज्यात विक्रमी आर्थिक व्यवहारांसाठी अग्रगण्य असणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपलाच झेंडा राहावा, यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत चुरशीने मतदान केले आहे. रविवार (दि. २७) एप्रिल रोजी सोलापूर शहर जिल्हा तसेच राज्याचे लक्ष लागलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदान केंद्रावरील गर्दी पाहता मोठ्या चुरशीने मतदान झाले. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघापेक्षा ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
दरम्यान, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकपदाच्या जागांसाठी सोलापूर शहरातील सिद्धेश्वर प्रशाला, नान्नज, तिऱ्हे, मंद्रूप, आहेरवाडी, निम्बर्गी, वळसंग, बोरामणी ८ मतदान केंद्रावर रविवार (दि.२७) एप्रिल रोजी सकाळी ८:०० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी सर्व मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरेद्वारा जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून सर्वत्र लक्ष ठेवण्यात आले. सकाळी ८:०० वाजल्यापासून मतदान सुरू झाले. परंतु त्यानंतर गर्दी पाहता पुढील दोन तासात मतदानाची टक्केवारी वाढली. यावेळी प्रथमच भाजप पक्षांतर्गत निवडणूक लागली होती. भाजप पक्षाचेच आमदार आमोरासमोर उभे ठाकले होते. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने, दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे यांच्या पॅनल विरोधात राज्याचे माजी सहकार मंत्री तथा आ.सुभाष देशमुख आ.विजयकुमार देशमुख यांनी पॅनल उभे केले आहे. भारतीय जनता पार्टीच्या दोन आमदारांमध्ये बाजार समितीसाठी लढत असल्याने कोण जिंकणार याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली आहे.
दरम्यान, बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सोसायटी मतदारसंघातून ११, ग्रामपंचायत मतदार संघातून ४, व्यापारी मतदारसंघातून २ आणि हमाल तोलार मतदारसंघातून १ अशा १८ जागा निवडून द्यायचा आहेत.माजी चेअरमन दिलीप माने यांनी तिऱ्हे मतदान केंद्रावर सकाळी ८:०० वाजता आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तर निम्बर्गी या मतदान केंद्रावर सुरेश हसापुरे यांनी मतदान केले.उत्तर तालुक्यातील नान्नज या गावी असलेल्या मतदान केंद्रावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, उमेदवार तथा भाजपचे युवा नेते मनीष देशमुख यांचे बंधू रोहन देशमुख हे ठाण मांडून असल्याचे दिसून आले. तसेच याच मतदान केंद्रावर उमेदवार गणेश वानकर, युवानेते पृथ्वीराज माने, उमेदवार अविनाश मार्तंडे हे सुद्धा ठाण मांडून होते. बाजार समितीचे सर्वाधिक मतदान हे सोलापूर शहरातील सिद्धेश्वर प्रशाला येथे असल्याने या केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. व्यापारी मतदारसंघात मुस्लिम समाजातून एकच उमेदवार आहे. परंतु व्यापारी वर्गातून यंदा बंडखोरी झाल्याने लिंगायत समाजातून तीन उमेदवार एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्या निकालाकडे ही सर्वांचे लक्ष राहणार आहे.
मतमोजणी आणि निकालासाठी यंत्रणा सज्ज.
मतमोजणी येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले आहेत. त्याचे नियंत्रण जिल्हा उपनिबंधक कार्यालय तथा बाजार समिती निवडणूक निर्णय कार्यालय येथे करण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणी कॅमेरे लावण्यात आल्याने मतदान व मतमोजणी पारदर्शी होणार आहे. तसेच कोणताही अनुचित व गैरप्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच डीबी पथक यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर सोमवार दि.२८ एप्रिल रोजी सकाळी ८:०० वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत मतमोजणी आणि अंतिम निकाल घोषित करण्यात येणार आहे.
किरण गायकवाड, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सोलापूर
निम्बर्गी मतदान केंद्रावर सुरेश हसापुरे व अप्पासाहेब पाटील यांच्यात झाला वाद.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान होत होते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी मतदान केंद्रात “पोलिंग एजंट शिवाय कोणाला बसू देऊ नका” असे सांगितल्यानंतर हा वाद वाढत गेला. माझ्या मुलाला तू बाहेर काढतोस का ? असे म्हणत सुरेश हसापुरे यांनी अप्पासाहेब पाटील यांच्यावर एकेरी उल्लेख केल्यानंतर काँग्रेस नेते तथा बाजार समितीचे माजी संचालक सुरेश हसापुरे आणि भाजपचे नेते तथा माजी संचालक आप्पासाहेब पाटील यांच्यामध्ये शाब्दीक बाचाबाची, हमरीतुमरी झाली. हे दोन्ही नेते एकमेकांच्या अंगावर धावून गेले, त्यामुळे मतदान केंद्रावर काही काळ तणाव निर्माण झाला होता. शेवटी पोलिस आणि इतर नेत्यांनी हस्तक्षेप करत हा वाद मिटविला.
गटनिहाय झालेले मतदान व टक्केवारी
मतदार संघ एकूण मतदान झालेले मतदान टक्केवारी
सहकारी संस्था १८९५ १८६४ ९८.०६
ग्रामपंचायत ११७६ ११६० ९८.६४
व्यापारी १२७६ १२०३ ९४.२४
हमाल तोलार १०८४ १००० ९२.२५
———————————————
एकूण ५४३१ ५२२७ ९६.२४