केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचे बाजार समितीत पडसाद
रात्रभर कांद्याची राखण केलेल्या शेतकऱ्यांना सहन करावा लागला शारीरिक मानसिक त्रास ;
जुन्या कांद्याच्या लिलावामुळे नवीन कांदा लिलाव राहणार बंद


प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१९ डिसेंबर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचे शहरात पडसाद उमटत आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक शब्दांचा वापर केल्याने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मधील अंमल माथाडी कामगारांनी रात्री अचानक काम बंद आंदोलन पुकारले. काम बंद आंदोलनामुळे यारा मध्ये विक्रीसाठी आणलेला शेतकऱ्यांचा कांदा जागेवरच पडून राहिला. त्यामुळे लिलाव झाला नाही.

लिलाव झाला नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तात्काळ हैदराबाद रोडवर ठिय्या मारत रास्ता रोको सुमारे तासभर चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे चक्काजाम झाला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खोळंबली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, शेतकऱ्यांना रास्ता रोको करण्यापासून प्ररावृत केले. परंतु शेतकरी रास्तारोको करण्यावर ठाम राहिले. शेवटी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र माने, सहायक पोलिस आयुक्त पोमण, पोलीस निरीक्षक चाटे आदीं अधिकाऱ्यांनी प्रकरणात शांततेने मार्ग काढला. शेतकऱ्यांना हैद्राबाद महामार्गावरून बाजार समितीच्या आवारात नेण्यात आले. तेथे बाजार समितीचे आधिकारी, व्यापारी प्रतिनिधी आणि शेतकरी यांच्यात बैठक झाली.

दरम्यान, हमाल माथाडी कामगारांनी अचानक कामबंद आंदोलन पुकारल्याने आमचा कांदा कवडीमोल दराने विक्री करण्याची वेळ आली असल्याने, आम्हाला बुधवारी झालेल्या लिलावाप्रमाणे दर मिळावे, अशी मागणी लावून धरली. ही मागणी सुरुवातील मान्य न झाल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी तात्काळ रस्त्यावर ठिय्या मांडणाऱ्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना बाजूला काढले. त्यानंतर चारही बाजूंनी वाहनांची वर्दळ सुरू झाली. तत्पूर्वी कामगारांनी अचानक पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे शेतकरी संतप्त झाला. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने यासंबंधी कळविणे आवश्यक होते. रात्रभर ताटकळत बसून कांदा चोरला जाऊ नये म्हणून राखत बसावे लागले. अशातच रात्री अचानकपणे कामबंद आंदोलन केल्याने शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले. दुकाने आणि हॉटेल बंद असल्याने शेतकऱ्यांना खाण्याची देखील मोठी पंचायत झाली.
संध्याकाळी काम सुरू आज बाजारपेठेत कांदा न आणण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
अमित शहा यांच्या वक्तव्याचा हमाल माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन करत निषेध केला. कामगारांच्या या कामबंद आंदोलनाचे पडसाद शेतकरी वर्गात उमटले. लिलाव होत मसल्याचे लक्षात आल्यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी बाजार समिती अधिकारी सचिव दत्तात्रय सूर्यवंशी, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, व्यापारी प्रतिनिधी केदार उंबरजे यांची शेतकरी, कामगार आणि व्यापाऱ्यांमध्ये बैठक संपन्न झाली. यावेळी शेतकऱ्यांना तसेच कामगारांना घटनेचे गांभीर्य लक्षात आणून देऊन, हा बंद मागे घेण्याचे आवाहन केले. त्यामुळे कामगारांनी संध्याकाळी ट्रक मधून कांदा उतरवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आज सकाळी उतरवलेल्या कांद्याचा लिलाव होऊन व्यापार केला जाईल असे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आज दि.२० डिसेंबर रोजी बाजारपेठेत कांदा विक्रीसाठी आणू नये असे आवाहन व्यापारी संघटनेसह बाजार समिती प्रशासनाने केले.
परिस्थिती नियंत्रणात आणली…आज कांदा लिलाव नाही
शेतकऱ्यांनी रस्ता रोको केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. पोलिसांना तात्काळ पाचरण केले. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकरी कामगार आणि व्यापारी यांच्यात बैठक घेऊन समेट घडवून आणला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणली. आज आलेल्या कांद्याचा उद्या लिलाव होईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन कांदा बाजारपेठेत विक्रीसाठी शुक्रवारी आणू नये. तसेच कामगारांनी अचानक बंद पुकारल्यामुळे त्यांना पत्राद्वारे बंद संबंधी सूचना करण्यात आली आहे.
दत्तात्रय सूर्यवंशी, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर.
लिलाव झाला नसल्याने कांद्याचे दर घसरणार
कामगारांनी अचानक लिलाव न करण्याचे घोषित करून बंद पुकारला. त्यामुळे बाजार समितीत आलेल्या शेतकऱ्यांना मानसिक व शारीरिक त्रास झाला. ७७ पाकिटे कांदा विक्रीसाठी आणला होता. कांदा चोरीला जाण्याच्या भीतीने रात्रभर पोत्याजवळ बसून होतो. कांदा लिलाव होणार नसल्याचे कळल्यानंतर दर घसरण्याची चिंता सतावत आहे. रात्रभर आणि दिवसा शेतकऱ्यांना कोणतीही सुविधा मिळाली नाही.
सुनील पाटील, कांदा उत्पादक शेतकरी हत्तुर.
कांद्याचे भाव वाढल्यानंतर डोळ्यात पाणी येते इतर वेळी येत नाही.
केवळ कांद्याचे भाव वाढल्यानंतर गृहिणींच्या डोळ्यात पाणी येते का? इतर वस्तू महाग झाल्यानंतर तुम्ही गप्प का बसता. जेव्हा कांद्याचे दर घसरतात तेव्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी निघते. साधे उत्पादन खर्च देखील निघत नाही. आज कांदा लिलाव बंद पडला उद्या दर घसरणार अशावेळी आम्ही काय करायचे.
शशिकांत पाटील, कांदा उत्पादक शेतकरी