मित्रासाठी मित्राचे पक्षविरहित राजकारण…! अखेर सभापतीपदी दिलीप माने विराजमान
पालकमंत्र्यांच्या एन्ट्रीने बाजार समितीच्या राजकारणात नव्या ट्विस्टची चर्चा !
प्रतिनीधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१२ मे
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत पक्षविरहित राजकारण पाहावयास मिळाले. मित्रासाठी मित्राने मैत्री जपत, सभापतीची माळ गळ्यात घातली. भाजपने सोलापुरात पाठविलेले पालकमंत्री जयकुमार गोरे यांची जिल्ह्यातील राजकीय खेळी यशस्वी झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांच्या राजकारणात पक्ष बाजूला ठेवून राजकारण केले जाते. त्याला बाजार समितीच्या राजकीय घडामोडी उत्तम उदाहरण ठरत आहेत. सदरची राजकीय खेळी सोलापूर बाजार समितीत यशस्वी झाला. या राजकीय स्ट्राईकमध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची भूमिका मोलाची ठरली. निवडणूक रणधुमाळीत पालकमंत्री गोरे यांनी माजी आमदार दिलीप माने यांच्या निवास्थानी दिलेली भेट, महाराष्ट्र दिनादिवशी शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री गोरे व माजी आमदार माने यांची झालेली गुप्त भेट सत्कारणी लागल्याचे दिसते.
बाजार समितीसाठी माजी आमदार दिलीप माने यांच्याकडे निर्णायक संख्याबळ होते. विजय निश्चित होता. परंतु बाजार समितीच्या सत्तेला राज्यातील सत्तेची साथ मिळविण्यासाठी त्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वासू शिलेदार हवा होता. हा शिलेदार म्हणून त्यांनी त्यांचे मित्र तथा पालकमंत्री गोरे व अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची मदत घेतल्याचे दिसले. आमदार कल्याणशेट्टी यांच्यामुळे माजी आमदार माने यांना सुरेश हसापुरे यांच्याकडील मते व आमदार कल्याणशेट्टी यांच्याकडील मतांचीही साथ मिळाली. पालकमंत्री गोरे व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मदतीने माजी आमदार माने यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंतची वाट अधिक सुलभ झाल्याचे दिसले.
दिलीप माने यांची २०१९ व २०२४ मध्ये आमदारकीची संधी हुकली. मित्राच्या मदतीतूनच आज त्यांच्या अंगावर २०१८ सालानंतर बाजार समितीच्या विजयाचा गुलाल पडला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची व सोलापूर जिल्हा मध्यवर्ती दिलीप माने सहकारी बँक निवडणुकीपूर्वी पालकमंत्री गोरेंचा पॉलिटिकल स्ट्राईक यशस्वी झाल्याने भविष्यात असे स्ट्राईक शहर व जिल्ह्यात होऊ शकतात. असे तर्क वितर्क लढवले जात आहेत.
तर उपसभापतींना अडीच-अडीच वर्षे
सभापती म्हणून सुरवातीची दोन वर्षे दिलीप माने, त्यानंतरची दोन वर्षे जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांच्यासाठी ठरल्याचे आज स्पष्ट झाले. सभापतिपदाचे उर्वरित एक वर्षे कोणाला? हा प्रश्न सध्या तरी सोडविण्यात आलेला नाही. उपसभापती म्हणून सुरुवातीची अडीच वर्षे सुनील कळके यांना तर नंतरची अडीच वर्षे श्रीशैल नरोळे यांच्यासाठीराखीव ठेवण्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.