बाजार समितीच्या सभापतीचे सूत्रे आमदार कल्याणशेट्टींच्या हाती
ज्याच्या पारड्यात कल्याणशेट्टीचे वजन तोच ठरणारं बाजार समितीचा कर्णधार ; सभापती पदासाठी हसापुरे यांच्या नावाची होतीय जोरदार चर्चा…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१० मे
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप युती पॅनलने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर काँग्रेसचे नेते तसेच भाजपचे नेते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सभापती पदासाठी नाव फायनल केल्याचे समजत आहे. सभापती निवडीची सर्व सूत्रे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे मुख्यमंत्र्यांनी सोपवली आहेत. त्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दक्षिणचे नेते काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याची घोषणा उद्या सभापती निवड प्रक्रियेत केली जाईल, असेही सांगण्यात येत आहे. निवडप्रक्रिया संपन्न करण्यासाठी नेते मंडळींनी आपले राजकीय डावपेच खेळण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, राज्यातील अव्वल क्रमांकाची असणारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या वर्चस्वाखाली राहावी, यासाठी अनेक नेते मंडळींनी चंग बांधला आहे. काँग्रेस भाजप अशी युती करून बाजार समितीवर आपलाच झेंडा फडकावला आहे. मात्र आता सभापतीचे घोंगडे भिजत पडले आहे. माजी सभापती तथा माजी आमदार दिलीप माने आणि काँग्रेसचे दक्षिण तालुक्यातील नेते किंग मेकर अशी ख्याती असलेले सुरेश हसापुरे यांच्यामध्ये सभापतीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झालेली आहे.
सहकारी संस्था आणि सोसायटी यांच्यावरील आपले वर्चस्व अबाधित ठेवत माने हासापूरे गटाने पुन्हा एकदा बाजार समितीवर आपला झेंडा फडकावला आहे. बाजार समितीवर आपल्याच गटाचे वर्चस्व सिद्ध झाल्यानंतर आता सभापतीसाठी वरिष्ठ पातळीपासून ते बाजार समिती पातळीपर्यंत जोरदार हालचाली सुरू आहेत. उद्या रविवार (दि.११) मे रोजी निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात येणार आहे. बाजार समिती प्रशासकीय इमारतीमधील मुख्य कार्यालयात असणाऱ्या कै.लोकनेते बाबुराव अण्णा चाकोते सभागृहात नूतन पदाधिकारी निवडीची पहिली सभा होणार आहे. त्यापूर्वी सभापती नावावर असे काम मुहूर्त होईल असे सांगण्यात येत आहे. यासाठी सभापतीचा चेंडू मुख्यमंत्र्याच्या कोर्टात दाखल झाला होता. मुख्यमंत्री फडणवीस हेच सभापतीचे नाव ठरवतील असे यापूर्वी सांगण्यात आले होते. परंतु आता आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडेच सभापती पदाची सूत्रे सोपवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ज्याच्या पारड्यात कल्याण शेट्टीचे पडणार वजन तोच बनणार बाजार समितीचा कर्णधार असे राजकीय समीकरण बाजार समितीच्या राजकीय वर्तुळात निर्माण झाले आहे.
सभापतीपदासाठी सुरेश हसापुरे यांचे नाव आघाडीवर
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी पॅनलने राज्यातील सत्ताधारी पॅनलला शह देत, पुन्हा एकदा राज्यातील विक्रमी आर्थिक उलाढालीसाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. विजयानंतर सभापती व उपसभापती निवडीसाठी जोरदार रेस सुरू झाली होती. यापूर्वी बाजार समितीचे सभापती हे पद दिलीप माने, राजशेखर शिवदारे यांनी भोगलेले आहे. तर उपसभापती म्हणून सुरेश हसापुरे यांनी कामकाज केले आहे. मागील निवडणूक जिंकल्यानंतर माने यांच्या गळ्यात सभापती तर उपसभापती म्हणून श्रीशैल नरोळे यांच्या गळ्यात माळ पडली होती. परंतु काही दिवसांत माने यांच्या जागेवर भाजप आ.विजय देशमुख यांना विराजमान केले होते. या राजकीय घडामोडीत हसापुरे यांची चाणक्यनीती कामी आली होती. आताच्या राजकीय घडामोडी पाहता सुरेश हसापुरे हे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मोठा धक्का देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जरी बाजार समितीची ही निवडणूक हसापुरे यांनी लढवली असली तरीही, राजकीय आखाड्यात अंतर्गत विरोधकांना अस्मान दाखवण्यात पटाईत असणारे हसापुरे जादूची कांडी फिरवावी तशी राजकीय गणितं फिरवण्याचा अनुभव आपल्या गाठीशी बांधून आहेत. त्यामुळे सभापतीपदी दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे यांचे नाव आघाडीवर आहे. अशी चर्चा बाजार समितीच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशा स्थितीत बाजार समितीचा कारभारी नेमके कोण होणार ? या दोघांपैकी एकाचे नाव अंतिम होते की ऐनवेळी तिसरे नाव पुढे येते, याबाबत देखील उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये लागून राहिलेली आहे. त्याचप्रमाणे उपसभापती पदावर अनिता विभूते किंवा सुनील कळके या दोघांपैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व जर तर च्या घडामोडींवर आज रात्री शिक्कामोर्तब होणार आहे. एवढे मात्र नक्की !