नेते मंडळींना लागले सभापतीपदाचे वेध ; बाजार समितीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांच्यात सभापती पदासाठी रस्सीखेच ?
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. ३ मे
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर आता नेतेमंडळींना सभापती व उपसभापती निवडीचे वेध लागले आहे. सभापती आणि उपसभापतीच्या रेसमध्ये येण्यासाठी नेते मंडळी आपल्या गॉड फादरकडे सेटिंग लावत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त संचालक मंडळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबई दौऱ्यावर जात असून मुख्यमंत्र्यांच्या दरबारातच बाजार समितीचे सभापती व उपसभापतींचे नाव निश्चित होणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वात माजी आमदार दिलीप माने तसेच राजशेखर शिवदारे, सुरेश हसापुरे यांच्या पॅनलने १८ पैकी १५ जागा जिंकून बाजार समितीवर वर्चस्व प्राप्त केले आहे. या निवडणुकीत सोलापूर दक्षिणचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वातील पॅनलमधून ग्रामपंचायत मतदारसंघात केवळ तीन उमेदवार निवडून आले आहेत. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून कल्याणशेट्टी यांनी काँग्रेस नेतेमंडळींच्या सहकार्याने ही निवडणूक जिंकल्याने भाजपमधील त्यांचे वर्चस्व आणखी वाढले आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवून विजय प्राप्त केल्याचे कल्याणशेट्टी यांच्या पॅनलमधील सर्वच नूतन संचालकांनी जाहीरपणे सांगितले आहे. आता सभापतीसाठी दिलीप माने, सुरेश हसापुरे आणि राजशेखर शिवदारे यांची नावे चर्चेत असली, तरी मुख्यमंत्र्यांच्या दरबारात कोणाचे नाव निश्चित होणार, याकडे सर्व नेते मंडळींचे लक्ष लागले आहे.

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार असून त्याअगोदर भाजप सोलापूर जिल्ह्यातील राजकीय ताकद आणखी वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेसमधील राजकीय ताकदीच्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून त्यांना सभापती व उपसभापतिपदाची संधी दिली जाणार असल्याची चर्चा बाजार समितीच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांच्यात सभापती पदासाठी रस्सीखेच…

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी पॅनलने राज्यातील सत्ताधारी पॅनलला शह देत, पुन्हा एकदा राज्यातील विक्रमी आर्थिक उलाढालीसाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. परंतु आता विजयी पॅनलमध्येच सभापती व उपसभापती पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. यापूर्वी बाजार समितीचे सभापती हे पद दिलीप माने, राजशेखर शिवदारे यांनी भोगलेले आहे. तर उपसभापती म्हणून सुरेश हसापुरे यांनी कामकाज केले आहे. मागील निवडणूक जिंकल्यानंतर माने यांच्या गळ्यात सभापती तर उपसभापती म्हणून श्रीशैल नरोळे यांच्या गळ्यात माळ पडली होती. परंतु काही दिवसांत माने यांच्या जागेवर भाजप आ.विजय देशमुख यांना विराजमान केले होते. या राजकीय घडामोडीत हसापुरे यांची चाणक्यनीती कामी आली होती. आताच्या राजकीय घडामोडी पाहता सुरेश हसापुरे हे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मोठा धक्का देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जरी बाजार समितीची ही निवडणूक हसापुरे यांनी लढवली असली तरीही, राजकीय आखाड्यात अंतर्गत विरोधकांना अस्मान दाखवण्यात पटाईत असणारे हसापुरे जादूची कांडी फिरवावी तशी राजकीय गणितं फिरवण्याचा अनुभव आपल्या गाठीशी बांधून आहेत. त्यामुळे सभापतीपदी नेमके कोण? विराजमान होणार हे मात्र येणारा काळच ठरवणार आहे.
सभापती निवडीसाठी ११ मे ला सभा
ही निवडणुक पार पडल्यानंतर सभापती व उपसभापती निवडीसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी ११ मे रोजी सकाळी ११ वाजता बाजार समितीच्या लोकनेते बाबुराव चन्नप्पा चाकोते प्रशासकीय भवन या मुख्य कार्यालयात सभा आयोजित केली आहे. सभेपुढील विषयानुसार निवडीचा संक्षिप्त कार्यक्रम असा : ११.१० ते ११.२५ यावेळेत नामनिर्देशन वाटप व स्वीकारणे, ११.३० नामनिर्देशनपत्र छाणनी, ११.३५ उमेदवार वैध यादी प्रसिद्ध करणे. ११.४५ : नामनिर्देशन पत्र माघार घेणे, दु. १२ वा. आवश्यक असल्यास मतदान व निकाल घोषित करणे. गणपुर्तीअभावी सभा तहकूब झाल्यास अर्धा तासाने सभा होईल. तरीही गणपूर्ती न झाल्यास सदरची सभा रद्द करण्यात येईल, असे बाजार समितीचे सचिव तथा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी सभा नोटीसीद्वारे कळविले आहे.