बाजार समितीच्या १८ जागांसाठी मतदान – आजी माजी सभापती नेतेमंडळींचे भवितव्य बॅलेट मतपेटीत होणार कैद

उद्या बाजार समितीच्या १८ जागांसाठी मतदानासाठी  ; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले हे आवाहन

बाजार समितीच्या मतदान व मतमोजनीस “सहकार” यंत्रणा सज्ज बॅलेट पेपरसह इतर साहित्याचे वाटप – जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड 

मतदानासाठी लागणारे बॅलेट पेपर सह इतर साहित्याचे झाले वाटप ; यंदा प्रथमच सीसीटीव्ही कॅमेरासह व्हिडिओ शूटिंग 

शहरी व ग्रामीण मतदान केंद्रावर रविवारी पाच वाजेपर्यंत मतदान : तर सोमवारी श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या सभागृहात मतमोजणी होऊन लागणार निकाल

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२६ एप्रिल

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी रविवारी (ता. २७) मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी सहकार विभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे. आज श्री सिद्धेश्वर प्रशाला मतदान केंद्र येथे मतदान प्रक्रियेसाठी लागणारे विविध साहित्य वाटप करण्यात आले. बॅलेट पेपरसह इतर साहित्य सुपूर्द केले. बाजार समितीची निवडणूक पारदर्शक वातावरणात व लोकशाही पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रिया व मतमोजणीचे प्रशिक्षण दिले आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. बाजार समितीसाठी राबविण्यात येणारी मतदान प्रक्रिया, मतदान प्रक्रियेदरम्यान कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी घ्यावयाची काळजी, या संदर्भात जिल्हा उपनिबंधक गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. मतदान प्रक्रियेसोबतच मतमोजणी प्रक्रियेचेही मार्गदर्शन करण्यात आले.

       दरम्यान, त्यानंतर सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध आठ मतदान केंद्रांवर आज रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतदान होणार आहे. मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तसेच सीसीटीव्ही कॅमेरा आणि व्हिडिओ शूटिंग करण्याची काळजी देखील घेण्यात आली आहे. सोलापूर शहरातील श्रीसिद्धेश्वर प्रशालेमध्ये सर्वाधिक मतदान संख्या आहे. व्यापारी मतदारसंघातील सुमारे १,२७६ आणि हमाल तोलार मतदारसंघातील १,०८४ मतदान येथे संपन्न होणार आहे. त्यामुळे येथे मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असणार आहे. त्यामुळे येथे पोलिस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

          सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानासाठी आता काही तासाचा अवधी उरला आहे. जर मतदारांचे नाव मतदार यादीत एकापेक्षा अधिक वेळा आल्यास त्या मतदाराला त्या मतदारसंघात केवळ एकदाच मतदान करता येणार आहे. मात्र वेगवेगळ्या मतदार संघासाठी करण्यात आलेल्या मतदार यादी नाव असेल तर संबंधित मतदाराला दोन वेळा मतदान करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. मतदान करण्यासाठी येताना मतदाराने स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र अथवा सक्षम शासकीय पुरावा सोबत आणणे अपेक्षित आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर नेमण्यात येणाऱ्या पुलिंग एजंट आणि संबंधित मतदाराची ओळख पटवून देण्यास सहकार्य करावे. ही निवडणूक पारदर्शक आणि निर्जोखिमपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

 सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आठ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले असून, १४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी प्रथमच मतदान केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, मतदान प्रक्रियेचे व्हिडिओ शूटिंग काढले जाणार आहे. या निवडणुकीत एकूण ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रविवारी (दि. २७) एप्रिल रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी १४० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर पाच ते सहा कर्मचारी असणार आहेत. २१ केंद्रांवर दोन पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सोलापुरातील सिद्धेश्वर प्रशाला येथे सात मतदान केंद्र असून, सर्वाधिक मतदार याच मतदान केंद्रात मतदान करणार आहेत. या सर्वच मतदान केंद्रावर सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी योग्य ती काळजी घेतली जाणार आहे. संवेदनशील मतदान केंद्र म्हणून कोणत्याही केंद्राची नसली तरीही पुरेपूर बंदोबस्त आणि व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. शिवाय आवश्यक पोलीस बंदोबस्त मागविण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांनी दिली.

आजी माजी सभापती व नेतेमंडळींचे भवितव्य बॅलेट मतपेटीत होणार कैद

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या शहर व जिल्ह्यातील विविध ८ मतदान केंद्रांवर सकाळी आठ वाजल्यापासून मतदान होणार आहे. या निवडणुकीत आजी माजी सभापती उपसभापती आणि नेतेमंडळी निवडणुकीचे रिंगणात उभे आहेत. यंदा बाजार समितीच्या राजकारणाला नवीन कलाटणी आली आहे. आपले पूर्वीचे गट तट विसरून विरोधी आमदार एकत्र आले आहेत. तर पूर्वाश्रमीचे मित्र एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. नव्या दमाच्या नव्या आमदारांनी आपले कौशल्य पणाला लावून दुधनी आणि अक्कलकोट बाजार समिती प्रमाणेच सोलापूर बाजार समिती काबीज करण्याचे स्वप्न ऊराशी बाळगले आहे. यात निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्यात नेतेमंडळी कितपत यशस्वी ठरतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे..का ? पूर्वाश्रमीचे विरोध होता आणि आता बनलेले मित्र बाजार समितीवर केवळ भाजपचा झेंडा फडकावणार का ? हे देखील पाहणे गरजेचे बनले आहे. काही नेते मडळी पुत्रासाठी तर काहींनी आपल्या वडिलांसाठी तर काहींनी आपल्या पत्नी व आप्तेष्टांसाठी बाजार समितीच्या राजकारणात आपले सर्वस्व पणाला लावले आहे. सर्वसाधारण जागेवर काटे की टक्कर आहे. तर ग्रामपंचायत आणि सोसायटी मतदारसंघात ठराविक गटाचे प्राबल्य दिसून येते. यामुळे ही निवडणूक आमदार विरोधात आमदार जे ही भाजप पक्षांतर्गत होणार असल्याने अनेकांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. सत्ताधारी पॅनल उमेदवारांनी गावागावात सभा बैठका घेऊन आपला विजय निश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे विरोधी पॅनलने देखील अनेकांचा पाठिंबा मिळवत निवडणूक जिंकण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. उद्या या सर्व नेतेमंडळींचे भवितव्य मतपेटीत कैद होणार असून सोमवारीच त्याचा खरा निकाल करणार आहे.

सोमवारी मतमोजणी

मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतपेट्या श्री सिद्धेश्वर सहकारी कारखाना परिसरातील आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक मंगल कार्यालय येथे आणण्यात येतील. याच ठिकाणी सोमवारी (दि. २८) मतमोजणी होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू होईल. दुपारी १२ वाजेपर्यंत अंतिम निकाल जाहीर होतील.

गटनिहाय मतदार संख्या

सोसायटी १८९५

ग्रामपंचायत ११७६

व्यापारी १२७६

हमाल तोलार  १०८४

एकूण  ५४३१

मतदान केंद्र

१)सिद्धेश्वर प्रशाला सोलापूर

२)तिन्हे (उत्तर सोलापूर)

३)नान्नज (उत्तर सोलापूर)

४)निम्बर्गी (दक्षिण सोलापूर)

५)मंद्रूप (दक्षिण सोलापूर)

६)आहेरवाडी (दक्षिण सोलापूर)

७)वळसंग (दक्षिण सोलापूर)

८)बोरामणी (दक्षिण सोलापूर)

मतदार प्रतिनिधी हे मतदार यादीतलेच असावे 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर रविवार दि.२७ एप्रिल रोजी शहर व ग्रामीण भागातील आठ मतदान केंद्रांवर मतदान संपन्न होणार आहे. जिल्हा उपनिबंधक तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या वतीने सर्व बाजारात समितीच्या निवडणुकीसाठीची यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेसाठी लागणारे कर्मचारी आणि साहित्य वितरित केले आहे. मतदान प्रक्रिया संपन्न करतेवेळी मतदार प्रतिनिधी हे मतदार यादीतलेच असावेत, अशी अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शक्यतो मतदार प्रतिनिधी हे मतदार यादीतलेच असावेत.

 किरण गायकवाड, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *