पालकमंत्री “जया भाऊंची मध्यस्थी”आली कामी…! दिलीप मानेंनी लावलेली फिल्डिंग यशस्वी
बाजार समितीचा ठरला खरा फार्मूला ; भाजप काँग्रेस नेते आले एकत्र
आ.कल्याणशेट्टी, कोठे, माने, हसापुरे, शिवदारे, शेळके, पवार, महागावकर आले एका छताखाली
आमदार सुभाष देशमुख यांना पॅनलमध्ये येण्याचे करणार आवाहन – आ. सचिन कल्याणशेट्टी
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१४ एप्रिल
गेल्या अनेक दिवसांपासून बाजार समितीचे भिजत पडलेले घोंगडे अखेर वाळवत घातले जात आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भाजप आणि काँग्रेस पक्षातील नेत्यांनी एकत्रित येत पॅनल तयार करून बाजार समितीची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बाजार समितीचा नवा फॉर्मुला ठरला असून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे, शहाजी पवार, राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके, अविनाश महागावकर, श्रीशैल नरोळे, हरीश पाटील हे सर्व नेते एकत्रित आले आहेत.
दरम्यान, सोमवारी शासकीय विश्रामगृहावर एकत्रित येऊन पत्रकार परिषद घेऊन केली. आमदार कल्याणशेट्टी यांनी ही निवडणूक आम्ही सर्वत्र एकत्र येऊन लढविणार असल्याचे घोषित केले. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अंतिम निर्णय घेतील. बुधवार दि. १६ एप्रिल रोजी आमच्या पॅनलची घोषणा होईल असेही ते म्हणाले. आमदार सुभाष देशमुख यांच्याशी चर्चा झाली आहे, मतदारसंघाची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे एकत्र येण्याशिवाय पर्याय दिसत नाही असे आमचे मत आहे. बापू सोबत यावेत, ही इच्छा आहे. त्यांनी यावे असे मी आवाहन करतो. असेही कल्याणशेट्टी यांनी यावेळी सांगितले. दिलीप माने म्हणाले, आम्ही सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक करतोय, बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करतोय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आम्हाला गरज आहे. म्हणून हा निर्णय घेतला.
सुरेश हसापुरे म्हणाले, गेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत विजयकुमार देशमुख होतेच ना. डी सी सी बँक, मार्केट कमिटी या निवडणुका पक्षीय सोडून लढवल्या जातात म्हणून आम्ही एकत्र आलोय. त्यात काही नवीन नाही. गतवर्षी प्रमाणे यावर्षी देखील निवडणूक लढवणार आहे. गतवर्षी विजयकुमार देशमुख हे भाजप काँग्रेसचे दुवा झाले होते. यंदाच्या वर्षी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सचिनकल्याण शेट्टी हे दुवा झालेले आहेत.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यामार्फत माजी आमदार दिलीप माने यांनी लावलेली फिल्डिंग अखेर कामाला..
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी जे जे शक्य होईल ते ते करा, परंतु ही निवडणूक जिंकलीच पाहिजे. असे आदेश प्राप्त झाल्यानंतर भाजप आमदारांनी गतवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील एकत्रित निवडणूक लढवण्यासाठी चंग बांधला होता. त्याला पालकमंत्री जयकुमार गोरे यांची सहकार्याची भूमिका लाभली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मदतीमुळेच हे नवे पॅनल तयार झाल्याचे चर्चा ऐकण्यास मिळत आहे. कारण सर्वप्रथम आमदार सचिन कल्याणशेट्टी या नव्या पॅनलसाठी तयार नव्हते. मात्र जयकुमार गोरे यांच्यामार्फत माजी आमदार दिलीप माने यांनी लावलेली फिल्डिंग अखेर कामाला आलेली आहे. गोरे यांच्या शब्दाला कल्याणशेट्टी यांनी नाकारलेले नाही. शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशाला शिरसंवाद मानून एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
सर्वच भाजपचे कार्यकर्ते असतील तर मी यायला तयार
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे की आता नेत्यांच्या निवडणुका संपल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या निवडणुका सुरू आहेत. नेत्यांनी कार्यकर्त्यांसाठी आता परिश्रम घ्यावे. त्यानुसार मी भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी लढणार आहे. मला बाजार समितीच्या निवडणुकीत यावे म्हणून आवाहन केले आहे तेथे जर सर्वच भाजपचे कार्यकर्ते असतील तर मी यायला तयार आहे.
आ. सुभाष देशमुख