त्यांनीच केला आमचा विश्वासघात – माजी संचालक बाळासाहेब शेळके
बाजार समितीच्या निवडणुकीत बदलाचे वारे ; बाळासाहेब शेळके यांनी आमदार सुभाष देशमुख यांना पाठिंबा…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१८ एप्रिल
राज्यामध्ये विक्रमी आर्थिक उलाढालीसाठी अग्रगण्य बाजार समिती म्हणून ख्याती असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठे राजकीय भूकंप घडत आहेत. सत्ताधारी पॅनल मधून वगळण्यात आल्यामुळे नाराज झालेले माजी संचालक बाळासाहेब शेळके यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या परिवर्तन पॅनलला पाठिंबा दिला आहे. सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी बोलताना सत्ताधाऱ्यांवर विश्वासघाताचा घणाघात आरोप केला आहे.
दरम्यान, याबाबत बोलताना शेळके म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवण्यासाठी माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, माजी उपसभापती श्रीशैल नरोळे, भीमाशंकर जमादार आम्ही सर्वजण बैठक घेतली. सदरची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची भेट घेतली. तसेच माजी सभापती विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांना देखील सोबत घेऊन एकत्रितपणे पॅनल करून ही निवडणूक बिनविरोध करू, कारण ते देखील सत्ताधारी आहेत, त्यांच्याकडे देखील बाजार समितीच्या राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे सर्वांना एकत्रित घेऊन निवडणूक बिनविरोध करू, असे प्राथमिक चर्चा करण्यात आली. त्यासंदर्भात आ.कल्याणशेट्टी यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र या चर्चेनंतर नेमक्या गोष्टी कशा पद्धतीने घडल्या, त्याचर्चांमध्ये आम्हाला डावलले गेले. वेळोवेळी अंधारात ठेवले गेले. असे असताना देखील आम्ही वारंवार विचारल्यानंतर देखील सांगितले गेले नाही. राजशेखर शिवदारे यांचे सासरे वारले नेते सांगलीला रवाना झाले. त्यांच्या नकळतपणे या सर्व गोष्टी होत राहिल्या.
सोमवारी, रात्री आम्ही एकत्रित भोजन केले. तेव्हा देखील सर्व काही व्यवस्थित सुरू आहे. असेच सांगण्यात आले. चर्चा व गाठीभेटी सुरूच होत्या. परंतु त्याबाबत वेळोवेळी विश्वासात न घेता आम्हाला अंधारात ठेवले गेले. याबाबत आम्ही हसापुरे आणि माने यांना विचारले असता सर्वकाही ठीक आहे, अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सर्व कळेल असे सांगून अंधारात ठेवले गेले. जेव्हा अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता, तेव्हा देखील पॅनल मध्ये कोण कोण आहे. हे देखील सांगण्यास तयार झाले नव्हते. स्वतः एका बंद खोलीत बसून कल्याण शेट्टी यांच्या सोबत चर्चा केली. जेव्हा आम्हाला खात्री जमा झाली की आम्हाला डावलले गेले आहे. तेव्हा मी स्वतःहून या निवडणुकीतून माघार घेतली. तसेच माजी सभापती राजशेखर शिवदारे आणि उपसभापती श्रीशैल नरोळे यांना देखील वेळोवेळी अपमानास्पद वागणूक दिली. आम्हाला विश्वासात न घेता पॅनल जाहीर केल्याने या निवडणुकीतून माघार घेत आम्ही परिवर्तन पॅनलला जाहीर पाठिंबा देत सुभाष देशमुख यांची भेट घेतल्याचे शेळके यांनी सांगितले.
शिवदारे स्वाभिमानासाठी पॅनल मधून बाहेर पडा
माजी सभापती राजशेखर शिवदारे आणि उपसभापती श्रीशैल नरोळे यांना वेळोवेळी अपमानास्पद वागणूक दिली गेली. शेवटपर्यंत गापील ठेवण्यात आले. एकत्रित लढण्याचे सांगून स्वतःच्या कार्यकर्त्यांना सोबत घेतले. ज्या ठिकाणी स्वाभिमान नाही अशा ठिकाणी निवडणूक लढवण्याचा अर्थ नाही. त्यामुळे स्वाभिमानासाठी राजशेखर शिवदारे यांनी या पॅनलमधून बाहेर पडावे असे आवाहन देखील यावेळी शेळके यांनी केले.
बाजार समितीचे ५४२१ मतदार
बाजार समितीचे एकूण मतदार ५४२१ असून, त्यामध्ये व्यापारी मतदार संघात १२७६, हमाल, तोलार मतदार संघात १०८४, ग्रामपंचायत मतदार संघात ११७६ आणि विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघात १८९५ मतदारांचा समावेश आहे.