ठरलं एकदाच…विनायक कोंड्याल महापौर !

महापौरपदाच्या शर्यतीत मोठा राजकीय ट्विस्ट; विनायक कोंड्याल यांचे नाव जवळपास निश्चित, किरण देशमुख माघार घेण्याच्या तयारीत

 

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२ फेब्रुवारी 

महापौरपदाच्या निवडणुकीत मोठा राजकीय बदल पाहायला मिळत असून, विनायक कोंड्याल यांचे नाव महापौर म्हणून जवळपास निश्चित मानले जात आहे. दुसरीकडे, सुरुवातीपासूनच शर्यतीत आघाडीवर मानले जाणारे किरण देशमुख यांनी माघार घेण्याचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षांतर्गत सहमती, वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबा आणि नगरसेवकांमधील वाढता विश्वास यामुळे विनायक कोंड्याल यांची बाजू भक्कम होत चालली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या बैठका, चर्चा आणि समीकरणांनंतर कोंड्याल यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

दरम्यान, किरण देशमुख यांनी आपली भूमिका लवचिक ठेवत पक्षाच्या निर्णयाला प्राधान्य देणार असल्याचे संकेत दिले आहेत. “पक्षहित सर्वात महत्त्वाचे आहे. वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल,” असे सूचक वक्तव्य देशमुख यांनी केले आहे. त्यामुळे त्यांची माघार जवळपास निश्चित मानली जात आहे.

विनायक कोंड्याल हे संघटन कौशल्य, प्रशासकीय अनुभव आणि सर्वसामान्यांशी असलेला थेट संपर्क यामुळे ओळखले जातात. त्यांच्या कार्यशैलीबद्दल नगरसेवकांमध्ये सकारात्मक मत असून, आगामी काळात शहराच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महापौरपदाच्या निवडीकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. जर सर्व काही ठरल्याप्रमाणे घडले, तर विनायक कोंड्याल शहराचे नवे महापौर म्हणून जबाबदारी स्वीकारतील आणि नव्या राजकीय पर्वाची सुरुवात होईल, असे चित्र सध्या दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *