निवडणूक कार्यालयातच सत्ताधारी विरुद्ध विरोधकांचा राडा
भाजपचे एबी फॉर्म ३ वाजून २ मिनिटांनी आले अधिकाऱ्यांनी दरवाजा केला बंद
सत्ताधारी पदाधिकारी आत जाऊ नये यासाठी विरोधकांनी कार्यालयाच्या दरवाज्यात केले ठिय्या आंदोलन
आमदार कल्याणशेट्टी म्हणाले आमचे उमेदवार अर्ज अगोदरच केले दाखल तर विरोधकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून हरकत घेणार असल्याचे सांगितले
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.३० डिसेंबर
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूकीचे नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी निवडणूक कार्यालय नॉर्थकोट प्रशालेत भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांना पक्षाचा ए आणि बी फॉर्म विहित वेळेत सादर करण्यावरून मोठा सावळा गोंधळ झाला. अर्ज दुपारी ३:०० वाजण्याच्या आत कार्यालयात सादर करणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही. यावरूनच विरोधकांनी कार्यालय परिसरात ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली.




दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या वतीने पक्षाचा ए आणि बी फॉर्म देण्यासाठी आलेल्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, निवडणूकप्रमुख तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे आदींनी ठीक २:४५ वाजता निवडणूक कार्यालयात प्रवेश केला. कार्यालयातील विविध निवडणूक केंद्रामध्ये ए आणि बी फार्म वितरित केल्याचे दिसून आले. जेव्हा निवडणूक कार्यालय दोन आणि चार येथे आले असता, अर्ज सादर करण्याची अंतिम वेळ ३:०० वाजल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कार्यालयाचा दरवाजा बंद केला. यावेळी दरवाजा उघडून आत प्रवेश करणाऱ्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आ.सचिन कल्याणशेट्टी आदींना विरोधी पक्षाचे नेते अमोल शिंदे, काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, उबाटाचे अजय दासरी या विरोधकांनी दरवाज्यात उभे राहून भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आत प्रवेश दिला नाही. यावेळी मोठा गोंधळ या ठिकाणी निर्माण झाला. विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. परंतु विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी तथा महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबसे, पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त विजय कबाडे आदींनी निवडणूक कार्यालयाकडे धाव घेत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्ही फुटेज तपासून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे हरकत घेणार असल्याचे विरोधकांकडून सांगण्यात आले.
तर दुसरीकडे निवडणूक कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन होत असल्याचे कळल्यानंतर कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रस्त्यावर देखील आंदोलन सुरू केले. ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, मनिष काळजे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, उद्धवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय दासरी, काँग्रेसचे अशोक निम्बर्गी यांच्यासह इतर विरोधकांची उपस्थिती होती.
आमचे एबी फॉर्म दिलेले आहेत केवळ पोहोच घेण्यासाठी आलो होतो
भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवारांचे ए आणि बी फार्म ऑलरेडी निवडणूक कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. त्याची पोच घेण्यासाठी आम्ही कार्यालयाकडे धावपळ करत होतो. विरोधकांचे कन्फ्युजन झाले आहे की त्यांना वाटले आम्ही एबी फॉर्म देण्यासाठी आलो आहोत. प्रत्येक निवडणूक कार्यालयामध्ये गर्दी असल्याने आम्ही पोहोच लवकर घ्यावी यासाठी गेलो होतो. आमच्या उमेदवारांचे बी फॉर्म कार्यालयात जमा करण्यात आले आहेत.
– आ.सचिन कल्याणशेट्टी, निवडणूक प्रमुख
सत्ताधाऱ्यांनी यंत्रणेचा गैरवापर केला.
सत्ताधाऱ्यांनी यंत्रणेचा गैरवापर करत चुकीच्या पद्धतीने एबी. फॉर्म देण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता अंतिम वेळ ३ वाजण्याची असताना सत्ताधाऱ्यांनी विहित वेळेत अर्ज दाखल करणे गरजेचे होते. परंतु त्यांनी तसे न करता तीन वाजून दहा मिनिटांनी कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आम्ही दरवाजामध्ये त्यांना अडवले. त्यापूर्वीच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कार्यालयाचा दरवाजा बंद केला होता. मात्र सत्ताधाऱ्यांनी यंत्रणेच्या बळावर आत जाण्याचा प्रवेश केल्यानंतर नाईलाजाने आम्हाला घोषणाबाजी करत या आंदोलन करावे लागले. कायद्याचे राज्य किमान १५ दिवसात तरी असावे. अशी आमची मागणी आहे.
– अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख शिवसेना शिंदेगट