लाईट अँड साऊंड शो नागरिकांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे होतायत क्लोज
महापालिकेच्या चुकीच्या धोरणामुळे ट्रॉय टेन धुळखात पडून : स्मार्टसिटी कंपनीने लक्ष देण्याची गरज
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि ८ जुलै – सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर तलावात वॉटर आणि शॉवर शो सुरु केला. मोठा गाजावाजा करत सुरू केलेला शो ला सध्या उतरती कळा लागली आहे. सोलापूरकरांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे लाईट अँड साऊंड शो बंदावस्थाकडे वळाला आहे.

सोलापूरकरांना एक वेगळी अनुभूती आणि आनंद मिळावा यासाठी सोलापूर महानगरपालिका स्मार्ट सिटी अंतर्गत लाखोंचा खर्च करून सदरचा लाईट अँड साऊंड शो सुरू करण्यात आला होता. या शोमध्ये ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचे चरित्र यांचे दृकश्राव्य माध्यमातून चित्रण प्रेक्षकांना दाखवले जात होते. सर्वप्रथम काही दिवस लाईट अँड साऊंड शो ला सोलापूरकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. वाढता प्रतिसाद पाहता महापालिका प्रशासनाने तिकिटांच्या दरात वाढ केली. तिकीटच्या दारात वाढ केल्याने नागरिकांनी तिकीट खरेदी न करता मंदिरात बसूनच शो पाहणे पसंत केले. त्यामुळे शो पाहण्यासाठी येणारा नागरिकांचा आणि भाविकांचा ओघ अत्यल्प होत गेला. पर्यायाने कंपनीला लाईट अँड शो चालवणे अवघड बनले. चार-पाच जणांसाठी हा शो सुरू करणे कंपनीला परवडनासे झाले. त्यानंतर शो बंद करण्याची नामुष्कीची वेळ आली. काही काळानंतर तर नागरिक आणि भाविक शो पाहण्यासाठी येणे बंद करत असल्याने शो बंद ठेवण्यात आला. अशी दयनीय अवस्था स्मार्ट सिटीच्या या नव्या उपक्रमाची झालेली आहे.
नागरिकांचा प्रतिसाद कमी झाल्यामुळे प्रशासनाने आठवड्यातील केवळ दोन दिवस म्हणजे शनिवार आणि रविवार याच दिवशी हा शो सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला परंतु या दोन्ही दिवशी देखील नागरिक शो पाहण्यासाठी येत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर ते देखील शो हळूहळू बंदावस्थेकडे वळाले आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत जेवढे काही कामे झालेले आहेत. किंबहुना नवीन उपक्रम सुरू केल्या आहेत त्यामध्ये सात्यातता राहिलेली नाही. सर्व कामे अत्यंत निकृष्ट आणि सुमार दर्जाची झालेली आहेत त्यामुळे याकडे नागरिकांनी चांगलीच पाठ फिरवल्याचे दिसत आहे. लाईट अँड साऊंड शो नंतर लहान मुलांसाठी सुरू केलेली ट्रॉय ट्रेन ही देखील संकल्पना मागे पडलेली दिसत आहे. सिद्धेश्वर तलाव परिसरात स्मार्ट सिटी कामांतर्गत काम सुरू होते. त्या कामाच्या वेळात काही दिवसांसाठी ट्राय टेन बंद करण्यात आली होती. ट्रॉय ट्रेन बंद ठेवलेल्या दिवसाचे पैसे महापालिका प्रशासनाने मक्तेदाराला मागितल्यामुळे मक्तेदाराने सदरचा मक्ताच रद्द केल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान महापालिकेच्या या शहाणपणामुळे चिमुकल्या बालगोपाळांना वेगळा अनुभव देणारी ट्रॉय ट्रेन देखील धुळखात अडगळीच्या ठिकाणी पडलेली दिसत आहे. सदरची ट्रॉय ट्रेन देखभाल दुरुस्ती अभावी बंद असून ती पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी लाखोंच्या खर्चाचा भुर्दंड मक्तेदाराला सोसावा लागणार आहे. ट्रेनची अनेक स्पेअर पार्ट आणि बॅटऱ्या कामाच्या प्रवाहात नसल्यामुळे बंद झाल्याने त्या पुन्हा एकदा पूर्ववत करण्यासाठी लाखोंचा खर्च येणार आहे. महापालिका प्रशासनाने लाईट अँड साऊंड शो चा मक्ता तीन वर्षासाठी बेंगलोरच्या कंपनीला दिला होता. या तीन वर्षांच्या मक्त्यामध्ये लाईट अँड साऊंड शो संपूर्ण देखभाल दुरुस्ती देण्यात आली होती. मात्र आता सदरचा मक्ता अंतिम टप्प्यात आला आहे. मक्ता संपण्या अगोदर शो ची अशी विदारक अवस्था बनली आहे. तर मक्ता संपल्यानंतर त्याची काय अवस्था असेल हा विचार देखील करावासा वाटत नाही.
विनाकारण पैसे का खर्च करावे……
मंदिराच्या पायऱ्यावर बसून मोफतमध्ये हा शो पाहण्यास मिळतो. मग विनाकारण पन्नास रुपये तीस रुपये तिकीट काढून शो का पहावा. शो जर चारी बाजूंनी बंद करून दाखवला असता तर तिकीट काढावे लागले असते. परंतु कोठेही उभारून पाहिले असता, साऊंड आणि लाईट शो नजरेला पडतो. विनाकारण पैसे का खर्च करावे.
– भाविक
महापालिका आयुक्त , पालिका प्रशासन आणि स्मार्ट सिटीने लक्ष देणे गरजेचे….
स्मार्टसिटी अंतर्गत सुरू असलेले विकास कामे अशा पद्धतीने बंद पडतात. त्यामुळे स्मार्ट सिटीची चौकशी व्हावी. या शो मधून नागरिकांना केवळ मनोरंजन मिळाले परंतु त्यामध्ये सातत्य टिकवता आले. साडेचार कोटींचा चुराडा या निमित्ताने झाला आहे. सदरच्या कामासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत सुमारे साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र सध्या त्याची अवस्था दयनीय बनलेली आहे. त्यामुळे याकडे महापालिका आयुक्त , पालिका प्रशासन आणि स्मार्ट सिटीने लक्ष देणे आवश्यक बनले आहे.
केतन शहा , सोलापूर विकास मंच सदस्य