गणरायाचे आगमन खड्डेमय रस्त्यातून…..!

महापालिका प्रशासनाने बोध घेण्याची गरज……
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज ,
सोलापूर दि. ४ सप्टेंबर – स्मार्ट सिटीतील स्मार्ट रस्ते डबघाईला आले आहेत. दोन दिवसाच्या पावसाने रस्त्यांची अक्षरशः दाणादाण उडवली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खराब रस्त्यांची नागरिकांनी स्व:खर्चाने डागडुजी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे महापालिका प्रशासन झोपेत आहे का ? असा सवाल आता शहरवासीयांसह गणेशभक्तांमधून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान लाडक्या गणरायाचे आगमन शनिवारी होणार आहे. त्या अनुषंगाने शहरातील विविध ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. श्रींचे आगमन याच खड्डेमय रस्त्यातून होणार असल्याचे निदर्शनास आल्यानंतर काही सुजाण नागरिक आणि गणेशभक्तांनी स्व:खर्चातून खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली आहे. नवीपेठेकडे जाणाऱ्या एकेरी मार्गावर , सर्वत्र खड्डेच-खड्डे पडल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यावरून जाताना नागरिकांना तसेच वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशातच गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शहरवासीय आणि गणेशभक्तांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
सिमेंट काँक्रीटच्या साह्याने खड्डे बुजवले.
गणपती बाप्पांच्या मिरवणूक या रस्त्यावरून होत असतात. यारस्त्यांची अवस्था पाहता गणेशभक्तांनी स्वतःहून खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सिमेंट काँक्रीटच्या साहाय्याने खड्डे बुजवण्यात आले. रस्त्याच्या कडेलाच बांधकाम सुरू आहे. त्याच बांधकामाच्या साहित्यातून खड्डे बुजवले आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने डांबरीकरण करावे….
महापालिका प्रशासनाने रस्त्यांची डागडुजी करणे गरजेचे असताना, तसे केले जात नाही. वास्तविक पाहता महापालिका प्रशासन संपूर्ण कर वसूल करते. परंतु सुविधा देण्यामध्ये कमी पडते. गणेशोत्सव दोन दिवसात येऊन ठेपला आहे. तरीदेखील खराब रस्त्यांचे डांबरीकरण किंवा डागडूजी झाली नाही. प्रशासनाने तात्काळ करून घ्यावे अशी मागणी आहे.
– नंदू होनप , गणेशभक्त.