काँग्रेसला धक्का ; श्रीदेवी अन् जॉन अण्णा भाजपमध्ये दखल
सोलापूर व्हिजन न्युज
सोलापूर, दि.३० नोव्हेंबर
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला सोलापुरात मोठा धक्का बसला आहे. दोन टर्म नगरसेविका असलेल्या श्रीदेवी फुलारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, माजी महापौर दिलीप कोल्हे यांच्या उपस्थितीत आपले पती जॉन फुलारे यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजप प्रवेश केल्यानंतर श्रीदेवी फुलारे यांनी विमानतळावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत फुलारे हे भाजपमध्ये जाणार होते. परंतु त्या अगोदरच त्यांचे पारंपारिक विरोधक अंबादास करगुळे आणि माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसवर नाराज असलेल्या फुलारे यांनी शेवटी त्यावेळचे काँग्रेस उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारात उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याचे दिसून आले.
दरम्यान, प्रभाग १५ मध्ये अनुसूचित जाती महिला हे आरक्षण असल्याने काँग्रेस पक्षाकडून श्रीदेवी फुलारे यांची वाट मोकळी आहे. पण यापूर्वीच वैष्णवी करगुळे हे भाजपमध्ये गेल्याने त्या ठिकाणी आता फुलारे हे सुद्धा भाजपमध्ये गेले आहेत. यामुळे प्रभाग १५ मधील अनुसूचित जाती महिलांच्या उमेदवारीसाठी निश्चितच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.