चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांनी श्रीसिद्धेश्वर मंदिर फुलले…. बिल्वपत्र अर्चना ओम नमः शिवाय झाला जप….
श्रीसिध्देश्वर महाराजांचा जयघोषाने दुमदुमला मंदिर परिसर….
सोलापूर व्हिजन
सोलापूर , दि. २६ ऑगस्ट – एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र…’ श्री सिद्धेश्वर महाराज की जय जयघोषात मंदिर परिसर भक्तांनी अक्षरशः फुलून गेले होते. चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त श्रींचे दर्शन घेण्यासाठी आबालृद्ध भाविकांनी ग्रामदैवत श्रीसिद्धेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मांदियाळी होती. यावेळी शिवयोग समाधीस आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली होती. त्यावर ओम नमः शिवाय लिहिण्यात आले होते. तसेच समाधीवर सौंदर्यपूर्ण मेघडंबरी साकारण्यात आली होती.
सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शिवाची आराधना केली जाते. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहराचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांना शिवाचे प्रतिरूप मानले जाते. त्यामुळे भाविकांची या संपूर्ण महिन्यात श्रींचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गर्दी असते.
विशेषत्वाने श्रावणी सोमवारी पहाटेपासूनच महिला भाविकांची मोठी मांदियाळी या ठिकाणी होत असते. चौथ्या श्रावण सोमवार निमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आणि विधी संपन्न झाले.
दरम्यान समाधीस फुलांची सजावट करण्यात येऊन ओम नमः शिवाय जप आणि बिल्वपत्र आर्चना करण्यात आली. तांदूळ पूजा संपन्न करून सामूहिक ओम नमः शिवाय जप आणि सकाळी साडेआठ वाजता श्रींची महाआरती संपन्न झाली. यावेळी मंदिर सभामंडपात श्री सिद्धरामेश्वरांचे रांगोळीच्या माध्यमातून आकर्षक प्रतिमा साकारण्यात आली होती. महिला आणि पुरुष अशा दर्शन रांगेतून भक्तांची मोठी मांदियाळी मंदिर सभागृहात दिसून आली..
नवचैतन्य आणि आत्मिक समाधान मिळते…
दर श्रावणी सोमवारी सिद्धरामेश्वर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात येत असतो. मंदिरात आल्याने एक नवचैतन्य आणि आत्मिक समाधान मिळते. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पवित्र श्रावण सोमवार उपवास करतो आणि श्रींचे दर्शन घेऊन धन्य पावतो.
– धनश्री पट्टे , महिला भाविक.
यंदा पाच श्रावणी सोमवार
यंदा श्रावणामध्ये पाच श्रावणी सोमवार आले आहेत. चौथ्या श्रावणी सोमवारी शिवमुठ जवस महादेवाच्या पिंडीवर वहायची आहे. लाभप्राप्तीसाठी सदरचे शिवमुठ वाहून मुखी ओम नमः शिवाय जप करणे कर्मप्राप्त आहे. अनेक भक्तांचा देवाधिदेव महादेवांवर विश्वास आहे. त्यामुळे पवित्र श्रावण महिन्यात वर्तवैकल्य उपवास करून श्रींना प्रसन्न केले जाते.
– चिदानंद स्वामी , पुरोहित.