श्रीसिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात चिमुकल्यांनी अनुभवले कुतूहल !
चायनीज सुलतान बोकड, वजनदार राजा कोंबडा, बुटकी गाय राधा म्हैस आणि ऐटदार खिलार वळू पाण्यासाठी बच्चेकंपनी दिसली आतुर…
सोलापूर, दि.२४ डिसेंबर
श्रीसिद्धेश्वर देवस्थान यात्रा समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे, यंदाच्या वर्षीही ५४ वे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन होम मैदान येथे करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनात शेतीविषयक अवजारे, बी बियाणे, फळे, अत्याधुनिक तंत्रज्ञान, त्याच पद्धतीने गृहिणींसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंची खरेदीसाठी सुमारे ३०० स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. आज मंगळवार दि.२४ डिसेंबर रोजी शहरातील विविध शैक्षणिक संस्थांनी शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट दिली.
दरम्यान या शैक्षणिक सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी शेतीविषयक विविध साहित्यांची अवजारांचे आणि त्यासंबंधी लागणाऱ्या वस्तूंची माहिती जाणून घेतली. त्याच पद्धतीने आपल्या स्वयंपाक घरात लागणाऱ्या विविध वस्तूंची पाहणी देखील यावेळी त्यांनी केली. या प्रदर्शनात आकर्षक असे पेंटिंग्सचे दालन देखील उभारण्यात आले आहे. त्या दलानास देखील विद्यार्थ्यांनी भेट देऊन चित्रकारांकडून माहिती घेतली.
विद्यार्थ्यांचा कुतुहलाचा विषय
५४ व्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात मुख्य आकर्षण असणारे चायनीज सुलतान बोकड, वजनदार राजा कोंबडा, बुटकी गाय राधा म्हैस आणि ऐटदार खिलार वळू पाण्यासाठी बच्चे कंपनी आतुर झालेली दिसून आली. यासाठी विशेष प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यामध्ये विशिष्ट पंगुर प्रजातीच्या गायींचा समावेश होता. सुमारे दहाहून अधिक पंगुर प्रजातीच्या बुटक्या गायीचें विशेष आकर्षण ठरले.