श्रीसिध्देश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शनाचे भूमिपूजन
२५ ते २९ डिसेंबर पाच दिवस चालणार शेतकरी आणि उद्योग विकासासाठी ठरणार पर्वणी…

सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१५ डिसेंबर
ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वर यात्रेचे प्रमुख आकर्षण आणि शेतकरी व औद्योगिक विकासासाठी मार्गदर्शक पर्वणी आणि वरदान ठरलेले राज्यस्तरीय श्री सिध्देश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शन यंदा २५ डिसेंबरपासून होम मैदानावर भरणार आहे. त्याच होम मैदानाचे भूमिपूजन सोमवारी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे भीमाशंकर पटणे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येऊन हातोडा मारण्यात आला. हे कृषी प्रदर्शन २५ ते २९ डिसेंबर असे पाच दिवस हे प्रदर्शन चालणार असल्याची माहिती श्री सिध्देश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शन समितीचे अध्यक्ष गुरुराज माळगे यांनी दिली.


पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात पुष्प प्रदर्शन, पारंपरिक देशी बियाणे महोत्सव, तांदूळ महोत्सव, पशु प्रदर्शन, डॉग शो, कॅट शो होणार आहेत. या सोबतच कृषी व औद्योगिक औजारांचे प्रात्यक्षिकही असणार आहेत. हिंद केसरी सोन्या बैल हे यंदाच्या प्रदर्शनाचे आकर्षण राहणार आहे. यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज कडादी, सोमशंकर देशमुख, यात्रा कमिटीचे चेअरमन महादेव चाकोते, डॉ.राजेंद्र घुली, काशीनाथ डोले, सुरेश म्हेत्रे, विश्वनाथ लब्बा, सिद्धेश्वर बामणी, मल्लिनाथ मसरे, रतन रिक्के,पशुपतीनाथ माशाळ आदींची उपस्थिती होती.
श्री सिध्देश्वर देवस्थान यात्रा समितीच्यावतीने होणाऱ्या या प्रदर्शनास महाराष्ट्र शासनाचे कृषी विभाग, आत्मा सोलापूर, जिल्हापरिषद कृषी विभाग, सोलापूर गारमेंट मॅनुफॅक्चरर्स असोसिएशन आणि सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनसह इतर संस्थांचे सहकार्य लाभणार आहे.