राजकीय डावपेच आखण्यात कमी पडलो : धर्मराज काडादी !
विधानसभा निवडणुकीत वापर करून घेणाऱ्यांवर नाव न घेत हाणला टोला…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१६ डिसेंबर
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी पहिल्यांदाच राजकीय भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, पहिल्यांदाच निवडणूक लढलो, वेळ कमी असताना संपूर्ण ताकदीनिशी निवडणुकीला सामोरे गेलो. परंतु निवडणुकीचे राजकीय डावपेच आखण्यात कमी पडलो. तसेच निवडणुकीमध्ये वापर करणाऱ्यांनी आमचा वापर करून घेतला. शेवटी नशीब लागते, असे म्हणत विधानसभा निवडणुकीत वापर करून घेणाऱ्यांवर नाव न घेता टोला हाणला.
दरम्यान, धर्मराज काडादी यांनी विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. निमित्त होते श्री सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शन पत्रकार परिषदेचे ! पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना धर्मराज काडादी पुढे म्हणाले की, निवडणूक लढवण्याचा हा निर्णय माझा स्वतःचा होता, कोणी हा निर्णय माझ्यावर लादला नाही. परंतु राजकीय डावपेच आखण्यामध्ये आम्ही कमी पडलो. स्वकीय आणि परकीय यांच्यातील फरक लवकर ओळखता आला नाही. मात्र निवडणूक जिंकण्यासाठी नशीब लागते. त्यामुळे शेवटी नशीब असे म्हणत धर्मराज काडादी यांनी विधानसभा निवडणुकीच्या राजकारणावर पहिल्यांदाच भाष्य केले.
ते पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत आम्ही सर्वस्व पणाला लावले. परंतु वेळ कमी होता. कमी वेळेमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. तो शेवटी माझा निर्णय होता. ही निवडणूकीत झालेला पराभव हा कोणा एका मुळे झालेला नाही. त्यामुळे या पराभवाचे खापर कोणाच्याही माथी मारणे योग्य नाही. मात्र निवडणुकीमध्ये करेक्ट कार्यक्रम झाला हे कडादी यांनी मान्य केले. असे त्यांच्या बोलण्यातून आणि बोली भाषेतून दिसून आले. शेवटी विषयांतर होऊ नये आपला सध्या हा कृषी प्रदर्शन आणि गड्डा यात्रा असून त्यावर आता लक्ष केंद्रित असू द्या, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.