राज्यस्तरीय श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे आयोजन :जगातील सर्वात लांब १५ इंच लांब गव्हाची लोम्बी आकर्षण…

राज्यस्तरीय श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे आयोजन !जगातील सर्वात लांब १५ इंच लांब गव्हाची लोम्बी आकर्षण…

गुलाब पुष्प प्रदर्शनात ५०० हून अधिक विविध गुलाब पुष्प एकाच ठिकाणी पाहण्यास मिळणार

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२२ डिसेंबर

श्री सिद्धेश्वर देवस्थान यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे यंदाही श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे. यंदा प्रदर्शनाचे ५५ वे वर्षे आहे. या निमित्ताने होम मैदान येथे सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत दि.२५ ते २९ डिसेंबर या ५ दिवसांच्या कालावधीत होणाऱ्या कृषी प्रदर्शनात ३०० स्टॉलचे नियोजन करण्यात आले आहे. कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद सोलापूर, महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या विशेष सहकार्याने व स्मार्ट एक्स्पो ग्रुप च्या व्यवस्थापन अंतर्गत भरविण्यात येत आहे. तसेच कृषी संशोधन केंद्र, सोलापूर डाळिंब संशोधन केंद्र, रब्बी ज्वारी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर व मोहोळ विभाग, रेशीम खादी ग्रामोद्योग, पशुसंवर्धन, सामाजिक वनीकरण व राष्ट्रीयकृत बँका, नाबार्ड, कृषी महाविद्यालय, कृषी स्टार्टअप उद्योजक, नवा उद्योजक, कृषी यांत्रिकीकरण, फळ रोपवाटिकाधारक, साखर कारखाने यांच्या सहभागाने आयोजित केले जाणार असल्याचे श्री सिद्धेश्वर देवस्थान बंद कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी आणि कृषी प्रदर्शनाचे अध्यक्ष गुरुराज माळगे यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रदर्शनात रोझ क्लब सोलापूर यांचे विशेष सहकार्यातून भव्य राज्यस्तरीय गुलाब पुष्प प्रदर्शन, ५०० हून अधिक विविध गुलाब पुष्प एकाच ठिकाणी पाहण्यास मिळणार आहेत. महाराष्ट्रातील सोलापूर, नाशिक, पुणे बाएफ संस्था यांचेकडील शेतकऱ्यांनी स्वतः तयार केलेले ५०० प्रकारचे दुर्मिळ देशी बी-बियाणे प्रदर्शित करणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना विक्रीसाठीही उपलब्ध असणार आहेत.दि.२६ डिसेंबर रोजी गाय, बैल, वासरू, म्हैस अशा विविध पशु प्रजाती तसेच देशी गोवंश मधील विविध प्रजातीचे भव्य प्रदर्शन व स्पर्धा. दि.२७ डिसेंबर रोजी ३५ हून अधिक विविध देशी व विदेशी प्रजातींच्या श्वानांचे प्रदर्शन (डॉग-शो) व कॅटशो स्पर्धा. तसेच याचदिवशी पुष्प रचना स्पर्धा. दि.२८ डिसेंबर रोजी विविध प्रकारचे पाळीव मांजरांचे प्रदर्शन व स्पर्धा संपन्न होणार आहेत. या भव्यदिव्य प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस नीलकंठ कोनापुरे, गुरुराज माळगे, विश्वनाथ लब्बा, मल्लिनाथ मसरे, विलास कारभारी, विजयकुमार बरबडे, पशुपती माशाळ, रतन रिक्के आदींसह पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

 

प्रदर्शनाचे आकर्षण

या भव्यदिव्य प्रदर्शनात ३०० हून अधिक शेतीविषयक कंपन्यांचा सहभाग असणार आहे. भारतातील विविध कंपन्याचे ट्रॅक्टर्स व शेती अवजारे एकाच ठिकाणी शेतकरी बांधवांना पाहण्याची संधी, वाहन महोत्सव, शेती विषयक प्रक्रिया उद्योग, महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या, शेतकऱ्यांसाठी सर्व योजनांची माहिती देणारी दालने, केवळ २० मिनिटांमध्ये १ एकर क्षेत्राची फवारणी करणारे रिमोट ऑपरेटेड ड्रोनचे लाईव्ह प्रात्यक्षिक व शेतकरी बांधवांना फवारणी क्षेत्रातील उद्योग करण्यासाठी उपयुक्त असा ड्रोनचे दालन, रोझ क्लब सोलापूर यांचे विशेष सहकार्यातून भव्य राज्यस्तरीय गुलाब पुष्प प्रदर्शन, ५०० हून अधिक विविध गुलाब पुष्प एकाच ठिकाणी पहावयास मिळणार आहे, सेंद्रीय शेतीचे विशेष दालन, होम गार्डन किटचे लाईव्ह प्रात्यक्षिक,भाजीपाला रोपवाटिका व विविध दुर्मिळ अशा प्रजातींचे दालने, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचे लाईव्ह प्रात्यक्षिक, दुर्मिळ देशी ५०० हून अधिक बियाण्यांचे प्रदर्शन व विक्री, तांदूळ महोत्सव, परदेशी भाजीपाला प्रदर्शन, सौर ऊर्जा विषयक दालने यासह जगातील सर्वात लांब १५ इंच लांब गव्हाची लोम्बी आणि कुदरत १७ ही देशी बियाण्यांचे प्रदर्शन व विक्री असणार आहे.

– गुरुराज माळगे, अध्यक्ष श्री सिद्धेश्वर कृषी औद्योगिक पशुपक्षी प्रदर्शन समिती 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *