श्री श्री श्री बसवारूढ महास्वामीजी मठाचे संस्थापक श्री सद्गुरू ईश्वरानंद महास्वामीजी (आप्पाजी) यांचे लिंगैक्य…

श्री श्री श्री बसवारूढ महास्वामीजी मठाचे संस्थापक श्री सद्गुरू ईश्वरानंद महास्वामीजी (आप्पाजी) यांचे लिंगैक्य..

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२९ मे 

श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठाचे संस्थापक श्री सद्गुरू ईश्वरानंद महास्वामीजी (आप्पाजी) (वय ८८) यांचे गुरुवारी मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

         श्री सद्गुरू ईश्वरानंद महास्वामीजी यांचा जन्म सद्गुरु श्री बसवारुढ महास्वामी व माता बंगारम्मा यांच्या पोटी २८ नोव्हेंबर १९३८ रोजी जत तालुक्यातील सिंदूर गावात झाला. वयाच्या १२ व्या वर्षी दीक्षा घेऊन तसेच वयाच्या १४ व्या वर्षी विचार चंद्रोदय हा ग्रंथ श्रवण करून त्यांनी अवघ्या १५ व्या वर्षी वृत्ती प्रभाकर हा ग्रंथ ऐकला. वेद, उपनिषद, निजगुणांचे शडशास्त्र, न्यायघटित निश्चलदासांचे साहित्य, नीतीशास्त्र अशा अनेक ग्रंथांचे अध्ययन आणि चिंतन करून आप्पाजी यांनी आयुष्यभर लाखो भक्तांना आध्यात्मिक मार्गात प्रबोधनाचे कार्य केले. अनेक कुटुंबांना त्यांचा आध्यात्मिक व पारमार्थिक आधार होता. १९७४ साली विमानतळाच्यामागे कस्तुरबा नगरात श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठाची स्थापना, श्री राजेश्वरी देवीचे मंदिर, भक्त निवास, अन्नछत्राचीही उभारणी त्यांनी केली. तसेच सर्व जातीतील मुलांसाठी वेध अध्ययन गुरुकुलाची स्थापनाही आप्पाजी यांनी केली. आप्पाजी या नावाने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि राजस्थानात त्यांचा संख्येने शिष्य परिवार आहे.

 

महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी, आंध्र प्रदेशचे माजी मंत्री जी. जयराम, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह धार्मिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्र मधील मान्यवर मंडळी श्री श्री श्री बसवारूढ महास्वामीजी मठाचे साधक, भक्त आहेत. श्री सद्गुरू ईश्वरानंद महास्वामीजी यांच्या निधनाची वार्ता समजताच भक्तवर्गामध्ये शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव गुरुवारी दिवसभर सोलापूर विमानतळाच्या मागील श्री श्री श्री बसवारूढ मठात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दुपारी समाधीचा विधी झाला.

 

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख, माजी महापौर किशोर देशपांडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक सुनील इंगळे, विवेकानंद केंद्राचे महाराष्ट्र व गोवा प्रांत प्रमुख अभय बापट, प्रथमेश कोठे आदींनी श्री सद्गुरू ईश्वरानंद महास्वामीजी यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *